झुगरेवाडी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

| नेरळ | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा झुगरेवाडी ही आदिवासी भागातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेतील विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळा व गावाचा नावलौकिक वाढवला आहे. झुगरेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे हे फळ असून, विद्यार्थ्यांनी परीक्षा परिषदेचे सराव पेपर सोडवून सातत्यपूर्ण सराव केला. त्यात अनु पारधी व तृया पारधी या दोन विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत. मुख्याध्यापक रवी काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री पाटील, जनार्दन निरगुडा, लक्ष्मण पादिर यांनी जादा सराव तासाचे नियोजन करून विद्यार्थ्यांकडून चाळीस सराव पेपर सोडवून घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळविता आले. या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंत पारधी, सदस्य सुनील सावळा व सर्व शिक्षकांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version