। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील आदर्श शाळा असणार्या झुगरेवाडी शाळा ही वेगळ्या उपक्रमासाठी नावाजली जात आहे. या शाळेत प्रत्यक्ष अनुभवावर भर देऊन विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा विचार केला जातो. नवीन शैक्षणिक धोरणात प्रत्यक्ष कृती आधारित शिक्षणावर भर देण्यात आला आहे, त्यादृष्टीने या शाळेची वाटचाल असावी म्हणून आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असणारी साखर कशी तयार होते, याचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना जुन्नर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यात नेण्यात आले होते. विघ्नहर सहकारी साखर कारखान्यात गेल्यानंतर प्रत्यक्ष ऊस गव्हाणीत कसा टाकला जातो, पुढे त्यांच्यावर कोणती प्रक्रिया केली जाते याची माहिती येथील अधिकारी थोरात यांनी दिली. साखर तयार झालेल्या साखरेचे चार प्रकारात वर्गीकरण केले जाते आणि त्याबरोबर मशीनच्या साहाय्याने लगेचच गोण्या पॅकिंगची प्रक्रिया पूर्ण केली जाते. हा सर्व कुतूहलाचा विषय झुगरेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला आहे. यावेळी विद्यार्थ्यांसोबत वसंत पारधी, सुनील सावळा, अलका पारधी, नरीना हिंदोळे, मुख्याध्यापक रवी काजळे, शिक्षक नंदादीप चोपडे, सतीश घावट, राजश्री पाटील आदी उपस्थित होते.