। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील खांदाड रायगड जिल्हा परिषद शाळेत सोमवारी (दि.10) खाऊगल्ली कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या खाऊगल्ली कार्यक्रमाचे उद्घाटन राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेतील विध्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान आत्मसात व्हावे हा उद्देश ठेऊन शाळेतर्फे खाऊगल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या खाऊगल्ली कार्यक्रमात एकूण 21 विविध पदार्थांची दुकाने लावण्यात आली होती. त्यामध्ये गुलाबजाम, पावभाजी, भजी, कलिंगड, पॉपकॉर्न, दाबेली, पॅटिस, पाणी व शेवपुरी, फळांचा ज्युस, लिंबूसरबत अशा विविध पदार्थांची दुकाने लावण्यात आली होती. दरम्यान, राजिपचे माजी सभापती ज्ञानदेव पवार यांनी सर्व 21 दुकानधारक विध्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी 100 रुपये देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी केंद्रप्रमुख शंकर शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश पवार, उपाध्यक्ष तेजस्वी घर्वे, पालकवर्ग व खांदाड ग्रामस्थ उपस्थित होते.