। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागाला भिरा धरणाचे पाणी पुरवठा झाल्यास या भागातील पाणी टंचाईवर मात होऊन येथील दुष्काळी परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. या पाण्याचा मोठा वापर टाटा पॉवर वीज प्रकल्पांसाठी तर उर्वरित पाणी कुंडलिका नदीत सोडण्यात येत आहे. याच पाण्याचा 50 टक्के हिस्सा निजामपूर विभागाला देण्यात यावा, अशी मागणी निजामपूर विभागातील हजारो शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
कुंडलिका नदीला भिरा धरणामधून बॅकवॉटर स्वरूपात पाणी येते, ज्याचा मोठा भाग टाटा पॉवरसाठी वापरला जातो. या धरणातून 5.36 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येत आहे. गावकर्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, भीरा धरणातून कुंडलिका नदीत येणार्या पाण्याचा काही भाग निजामपूर विभागातील गावांसाठी वळवण्यात यावा. यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठीही पाणी मिळू शकते आणि दुष्काळी स्थिती थोडीफार तरी सुधारू शकते. याबाबत प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.