गॅस सिलेंडसह स्टोव्हही मिळेनासे झाले
मोरा बंदरात शंभरहून अधिक मासेमारी बोटींनी नांगर टाकला
| चिरनेर | प्रतिनिधी |
आखाती युद्धामुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना आता व्यावसायिक गॅस सिलेंडरची झळ बसली आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मच्छिमार स्टोव्हच्या शोधात फिरु लागले आहेत. मात्र स्टोव्ह आहे, तर बर्नल नाही. वाढत्या मागणीमुळे बाजारात तर दोन्ही मिळत नसल्याने पेचात सापडलेल्या मच्छिमारांवर मासेमारीसाठी जाणे अवघड होऊन बसले आहे. जेवण शिजवायलाच पर्याय उपलब्ध नसल्याने खोल समुद्रात मासेमारी जाणेही अवघड होऊन बसल्याने शंभरहून अधिक मच्छिमार बोटींनी बंदरात नांगर टाकला आहे. या अवघड परिस्थितीमुळे मात्र मच्छिमारांवर चिंतेचे सावट पसरले आहे.
शिमग्याचा सण साजरा करण्यासाठी आपापल्या गावी गेलेले हजारो मच्छिमार करंजा बंदरात माघारी परतले आहेत. शिमग्याची मजा लुटून माघारी परतलेल्या मच्छिमारांना मासेमारीचे वेध लागले आहेत. याआधी एका ट्रिपसाठी एकाच बोटीवरील 17 खलाशांचे जेवण बनविण्यासाठी 19 किलोचा एक गॅस सिलेंडर पुरेसा होता. आता मात्र युद्धामुळे मच्छिमारांना स्वयंपाक करण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेनासे झाले आहेत. खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांसाठी चुलीवर स्वयंपाक शक्य नसल्याने फक्त स्टोव्हचा एकमेव पर्याय मच्छिमारांकडे शिल्लक आहे. त्यामुळे उरण परिसरातील शेकडो मच्छिमार स्टोव्हच्या शोधात फिरताना दिसत आहेत. मात्र वाढत्या मागणीमुळे बाजारात स्टोव्हही मिळेनासे झाले आहेत. काही दुकानात स्टोव्ह आहे तर बर्नर नाही, अशी अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे. तीन दिवसांपासून उरणपासून तुर्भ्यांपर्यतची बाजारपेठ पालथी घातली. काही दुकानात स्टोव्ह मिळाला मात्र बर्नर मिळाला नाही, अशी व्यथा मच्छिमार दिलिप नाखवा यांनी मांडली.
याआधी व्यावसायिक 19 किलोचा गॅस सिलेंडर 1800 रुपयांमध्ये मिळत होता. आता मात्र तुटवड्यामुळे सिलेंडरसाठी चार हजारांवर किंमत मोजावी लागते आहे. तरीही सिलेंडर मिळत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.
– संजय पाटील, मच्छिमार व्यावसायिक
ज्यांची व्यावसायिक सिलेंडर, स्टोव्हची व्यवस्था झाली, अशा मच्छिमार बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी रवाना झालेल्या आहेत. मात्र ज्यांच्याकडे सिलेंडर, स्टोव्हची व्यवस्था झाली नसल्याने करंजा, मोरा बंदरात सुमारे शंभरेक मच्छिमार बोटी मासेमारीसाठी रवाना होऊ शकलेल्या नाहीत. युध्दामुळे हीच परिस्थिती पुढेही कायम राहिल्यास मासेमारी करुन परतणाऱ्या बोटींनाही स्वयंपाकासाठी इंधनाची उणीव भासणार आहे. त्यामुळे पुन्हा मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात रवाना होतील, याची शाश्वती नाही.
– रमेश नाखवा, व्यावसायिक
