। भंडारा । प्रतिनिधी ।
मनसर-गोंदिया महामार्गावर रविवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला बैलगाडीसह चिरडले. या अपघातात शेतकऱ्याचा आणि दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.
मोहाडी तालुक्यातील देव्हाडा (खुर्द) गावाजवळ मनसर-गोंदिया महामार्गावर हा भीषण अपघात झाला. रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास हिरालाल कांबळे (52) हे शेताकडून आपल्या बैलगाडीने घराकडे जात होते. दरम्यान रस्ता ओलांडत असताना वेगाने जाणारे करडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व देव्हाडा बीडचे बीट अंमलदार गोविंद ठाकरे यांच्या वाहनांची हिरालाल व त्यांच्या दोन बैलांना जोरदार धडक बसली. हि धडक एवढी भीषण होती की, यात दोन बैलांसह हिरालाल यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. संतप्त लोकांनी ठाकरे यांच्या वाहनाची तोडफोड करून ठाकरे यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये पोलीस कर्मचारी ठाकरे जबर जखमी झाले असून त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.