एमजीएम रुग्णालयात धक्कादायक प्रकार
दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात एका महिला रुग्णाच्या अंगावर पंखा पडून यात त्या जखमी झाल्या आहेत. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात त्यांचा जीव वाचला असून, डोक्याला चार टाके पडल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
कामोठे येथील एमजीएम रुग्णालय नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते. एमएमजीएम रुग्णालयातच काही दिवसांपूर्वी मृतदेहाच्या अदलाबदलीचा प्रकार घडला होता, तर आता फुफ्फुसाच्या आजारामुळे शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या महिला रुग्णाच्या अंगावर पंखा कोसळण्याची घटना घडली आहे. रत्नागिरी येथील प्रिया वाळंज या फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना उपचारासाठी 20 डिसेंबर रोजी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 21 डिसेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सात दिवसांनंतर महिलांसाठी असलेल्या सामान्य कक्षात हलवण्यात आले.
सामान्य कक्षात असताना 28 डिसेंबर रोजी दुपारी घडलेल्या घटनेनुसार सामान्य कक्षातील छतावर सुरु असलेला पंखा अचानक कोसळला. शस्त्रक्रियेनंतर आराम करत असलेल्या वाळंज यांना भेटायला आलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर हा पंखा कोसळून फिरत्या पंख्याच्या पात्यांनी वाळंज यांच्या डोक्याला जखम झाली आहे. यामुळे वाळंज याच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. नशीब बळवत्तर म्हणून घडलेल्या या अपघातात वाळंज यांच्या डोक्यावर निभावलं असल्याची संतप्त भावना रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाला गांभीर्य नाही
या घटनेची माहिती वाळंज यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला दिली असता याबाबत कुठलेही गांभीर्य दाखवले नाही. रुग्णालय प्रशासनातील अधिकार्यांनी फक्त तोंडी माफी मागून वेळ मारून नेल्याची माहिती रुग्णांचे नातेवाईक प्रदीप वाळंज यांनी दिली आहे.