। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे शहर व परिसरात गेले काही महिने अनधिकृत यू ट्यूब न्युज चॅनेल वाल्यांनी शांतता घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा खासगी यू ट्यूब न्युज चॅनेलला नव्याने निर्माण झालेले पत्रकार व त्यांना जोड मिळालेले काही जुने पत्रकार यांची मिलिजुळी सरकार निर्माण झाली आहे. यामुळे नागोठणे परिसरात पुन्हा एकदा यु ट्यूब न्युज चॅनेल वाल्यांचा ‘रात्रीस खेळ चाले’ हा प्रकार सुरू झाला आहे. त्यांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे, यावर नागोठणे परिसरात चर्चा रंगू लागली आहे.
यु ट्यूब न्युज चॅनेल्सनी सध्या नागोठणे परिसरासह सर्वत्रच धुमाकूळ घातलेला आहे. याच युट्यूब न्युज चॅनेल्सचे प्रतिनिधी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती विभागाच्या अधिकार्यांकडे पत्रकारांसाठी आवश्यक असणार्या सुविधांची वारंवार मागणी करीत असतात. याबाबतचे स्पष्टीकरण राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात आलेले आहेत. या संदर्भात मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकार्यांसोबत 1 मे, 2020 रोजी झालेल्या ई-मीटिंग मध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा युट्यूब चॅनेल्सची शासनाकडे कोणतीही नोंद होत नसल्याने ती अधिकृत समजण्यात येऊ नये. तसेच, या संदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यालयाला पुन्हा विचारणा करण्यात येऊ नये, अशी सक्त ताकीदही उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी रायगड, ठाणे, रत्नागिरी व पालघर या चारही जिल्ह्यांच्या जिल्हा माहिती अधिकार्यांना आपल्या लेखी आदेशान्वये दिली आहे.
नागोठणे परिसरांत युट्यूब न्युज चॅनल्स वाल्यांचा सध्या विविध प्रकारे ‘रात्रीस खेळ’ चालत आहे. यु ट्यूब वाल्यांचे हे पथक रात्री 8 नंतर बाहेर पडतात. विशेष करून मुंबई-गोवा महामार्गालगत असणारे हॉटेल्स, त्यासमोर उभी राहणारी वाहने, महामार्गावर मालवाहतूक करणारी वाहने, रेशनिंगचे धान्य पुरवठा करणारी वाहने यांच्यात काहीतरी दोष हेरून व कायद्याची त्रुटी शोधून त्यांचाच आधार घेऊन त्यांना सावज करून लुबाडण्याचे प्रकार सुरु आहेत. असे असतांनाही राज्य शासनाच्या माहिती महासंचालनालयाकडून पूर्णता अनधिकृत असल्याचा शिक्का बसलेल्या या युट्यूब न्युज चॅनेल वाल्यांना पोलीस प्रशासनाचा व इतर कुणाचाही धाक नाही. स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना नसल्याची तसेच या युट्यूब चॅनेल वाल्यांना कुणाचा आशिर्वाद आहे, याची उलट सुलट चर्चा होत आहे. दरम्यान, परिसरातील काही राजकीय पुढारी व हितसंबंधीय अशा तोतया युट्यूब पत्रकारांना आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी किंमत देत असतात. याबाबत येथील मूळ स्थानिक पत्रकारांकडून सरकारी यंत्रणेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नागोठण्यात तोतया पत्रकारांचा धुकाकूळ
