कशेळे येथे चारचाकी वाहन झाडावर आदळले

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या शहापूर- मुरबाड- कशेळे- कर्जत या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. कशेळे येथील खड्डे चुकवत असताना प्रवासी वाहन थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळले. दरम्यान या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, रस्त्यावर वाहने नसल्याने मोठा अपघात टळला आहे.

शहापूर- मुरबाड- कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर कशेळे गावाच्या हद्दीत रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. हे खड्डे वाहनचालक यांच्यासाठी धोक्याचे असल्याचे सांगितले जात आहेत. मात्र, राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून रस्त्यावर असलेले खड्डे बुजवावेत अशी कार्यवाही होत नाही. त्याचा परिमाण रस्त्याने वाहतूक करणाऱ्या अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.

कशेळे गावाजवळ एच पी पेट्रोल पंपाशेजारी दुचाकी चालक हा रस्त्यावरील खड्डा चुकवत असताना रस्त्यावर मोटारसायकल रस्त्याच्या मधोमध आली. त्यामुळे त्या खड्ड्यांनंतर मोटारसायकल चालकाला वाचवण्यासाठी वाहनचालक यांची गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. त्यावेळी रस्त्यावर मागून येणाऱ्या एम एच 45 सी यू 3000 या टोयाटो गाडी चालकाने प्रसंगावधान दाखवून गाडी रस्त्याच्या खाली उतरविली. यावेळी मोटारसायकलला थोडासा धक्का लागून त्याच्या हाता पायाला किरकोळ दुखापत झाली. टोयाटोच्या सर्वच एअर बॅग उघडल्याने चालकाला देखील किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्डे बुजवावेत याकरिता कशेळे ग्रामस्थांनी अनेक वेळा राज्य रस्ते विकास महामंडळ यांचे अभियंते यांची भेट घेतली आहे. व्यापारी संघटनेने उपोषणाचा ईशारा दिला असून स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील, दिनेश हरपूडे, राजू हरपूडे, सचीन राणे, विजय शिंदे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ यांचे उपाध्यक्ष अनिलकुमार गायकवाड यांची भेट घेतली. मुंबई येथील कार्यालयात भेट घेतल्यावर महामंडळाचे उपाध्यक्ष गायकवाड यांनी सदर रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी सूचना उपअभियंता अरुण देवकाते यांना केली. त्वरित सूचना देऊन सदर रस्ता तात्काळ दुरुस्थ करा अशी सूचना दिली. उपअभियंता अरुण देवकाते यांनी ठेकेदार पंधरा दिवसात रस्ता दुरुस्त करील असे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले. या बाबत उदय पाटील यांनी सदर अधिकारी यांना अनेक वेळा फोन करून रस्ता दुरुस्तीची आठवण करून दिली. परंतु, दोनच दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन देऊन अधिकारी वेळ मारून नेत आहेत. आज सुदैवाने एक तरुण मुलाचा जीव वाचला. परंतु, भविष्यात कोणाचा मृत्यू झाल्यावरच रस्ता दुरुस्त होणार का अशी विचारणा ग्रामस्थ करीत आहेत. सदर रस्ता 15 फेब्रुवारी पर्यंत दुरुस्त झाला नाही तर कशेळे ग्रामस्थ 16 फेब्रुवारी ला उपोषण करणार आहेत.

Exit mobile version