| महाड | वार्ताहर |
दोन दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून गारठा वाढला आहे. तालुक्यात महामार्गासह घाटमार्गावर धुक्याची झालर पसरल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे. हवेत दुपारी 12 वाजेपर्यंत गारवा जाणवत असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसतात.
थंडीची लाट उसळल्याने तालुक्यातील अनेकांनी ठेवणीतील उबदार कपडे वापरात काढले आहेत. तर बाजारपेठ, महामार्गालगत लोकरीचे कपडे विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. थंडीमुळे आरोग्याची काळजी घेत सकाळी व्यायाम करणार्या व फिरायला जाणार्यांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागात थंडी अधिक असल्याने नागरिकांकडून नाक्यानाक्यावर शेकोटी पेटवण्यात आल्याचे दिसते. पुढील महिनाभरात थंडीची लाट आणखी वाढण्याची शक्यता आहे. महामार्गावरील राजेवाडी फाटा तर राज्य मार्गवरील वरंध, माझरी वाघजाईसह महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट, वाडा-कुंभरोशी आदी मार्ग, डोंगररांगावर धुक्याचे आच्छादन पसरले दिसते. दृश्यमान कमी झाल्याने चालक संथ गतीने वाहने चालवत आहेत.