जन्मशताब्दी वर्षात वैद्य यांच्या स्मृतींना उजाळा; शाळेपासून तैलचित्रापर्यंत अलिबागने जपला शूर सुपुत्राचा वारसा
|अलिबाग |प्रतिनिधी|
देशासाठी प्राणांची आहुती देणारे माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा ४०वा स्मृतिदिन आज अलिबाग येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. जनरल वैद्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.
२०२६ हे जनरल वैद्य यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या शौर्याचा आणि अलिबागशी असलेल्या नात्याचा इतिहास त्यानिमित्ताने पुन्हा एकदा उजेडात आला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान सभापती प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, ॲड. रघुजी आंग्रे आणि आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील उपस्थित होते.
जनरल वैद्य यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान सभापती प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली अरुणकुमार वैद्य जन्मशताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या शौर्याचा आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
वैद्य कुटुंबाचे मूळ अलिबागचे. त्यांचे वडील श्रीधरपंत वैद्य हे सनदी अधिकारी होते आणि त्यांनी अलिबागचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. अरुणकुमार यांचे प्राथमिक शिक्षण अलिबागमध्ये झाले. सनदी अधिकारी होण्याची कौटुंबिक इच्छा बाजूला ठेवून त्यांनी लष्कराची वाट निवडली. शिस्त, धैर्य, अचूक निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर ते लष्कराच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. १ ऑगस्ट १९८३ रोजी त्यांची भूसेनाप्रमुखपदी नियुक्ती झाली. त्यांच्या शौर्याची दखल घेत त्यांना महावीरचक्रासह अनेक सन्मान मिळाले.
ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर जनरल वैद्य अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आले. धमकीचे फोन सुरू असतानाही त्यांनी कर्तव्य बजावले. निवृत्तीनंतर सरकारी सुरक्षा काढून घेतल्यानंतर १० ऑगस्ट १९८६ रोजी पुण्यात अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली.
लष्करप्रमुख असतानाही आपल्या मातृभूमीची आणि शाळेची ओढ जनरल वैद्य यांच्या मनात कायम होती. २८ सप्टेंबर १९८५ रोजी त्यांनी इंडस्ट्रीयल हायस्कूलला सदिच्छा भेट दिली.
शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या शिस्तीच्या संस्कारांमुळे आपण सेनाप्रमुखपदापर्यंत पोहोचलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शाळेला चांदीच्या ढालीची प्रतिकृती आणि दहा हजार रुपयांचा धनादेश दिला.
इंडस्ट्रीयल हायस्कूलला जनरल वैद्य यांचे नाव देण्याची कल्पना ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी पुढे केली. शाळा समितीच्या ठरावानंतर संस्थेने शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला आणि मान्यतेनंतर शाळेचे नामकरण ‘माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय, अलिबाग’ असे करण्यात आले.
जनरल वैद्य यांचे तैलचित्र अलिबागमध्ये असावे यासाठीही वालेकर यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील भिंतीवर त्यांचे तैलचित्र लावण्यात आले असून ऑगस्ट २०२५ मध्ये त्याचे अनावरण झाले.
