पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न; चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सिध्दीज् फिटनेस क्लबच्या सिध्दी वाकडे यांच्या पुढाकाराने अलिबागमधील मॅपल आयव्ही हॉटेलच्या सभागृहात मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. तसेच उखाणे, पारंपरिक वेशभूषा करून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवून आणले. दरम्यान, संगीताच्या तालावर केला जाणारा आनंददायी व ऊर्जावान फिटनेस व्यायाम झुंबाचेदेखील सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमातून पारंपरिक खेळाला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न केला गेला.
आजच्या पिढीला पारंपरिक खेळाची ओळख निर्माण व्हावी, म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणित योगा व झुंबा प्रशिक्षक, कोरिओग्राफर, मॉडेल तथा डान्सर असलेल्या सिध्दी वाकडे यांच्या संकल्पनेतून पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड देत मंगळागौर सारखा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोबाईलमध्ये रमणारी पिढीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. पाच वर्षांपासून मध्यम व वयोवृद्ध महिलांनीदेखील सहभाग घेऊन आनंद साजरा केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी स्नेहल शिवथरे आदी मान्यवरांसह फॅशन परीक्षक व कोरिओग्राफर जयेश पाटील, व्यावसायिक लक्ष्मी मुकादम, गायिका ज्योती मयेकर, ॲथलेटिक्स क्षेत्रातील समीर वर्तक आदी उपस्थित होते.
यावेळी मंगळागौर हा कार्यक्रम दोन गटांमध्ये घेण्यात आला. तसेच, या पारंपरिक कार्यक्रमाला आधुनिकतेची जोड देण्यात आली. या मंगळागौर कार्यक्रमात चिमुकली गटामध्ये क्रशा पाटील हीला सर्वोत्कृष्ट सादरीकरण, दुर्वा पाटील हीला सर्वोत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा, अन्विका शिवथरे हिला सर्वोत्कृष्ट सौंदर्यवती आणि यशस्वी मेस्त्रीला सर्वोत्कृष्ट स्फूर्तीशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सरप्राईज नेम म्हणून रित शास्त्री हिला पुरस्कार देण्यात आला. तसेच, महिला गटामध्ये शामली पाटील यांना सर्वोत्कृष्ट सादरीकरण, खुशी नाईक यांना सर्वोत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा, ऋतुजा फफे यांना सर्वोत्कृष्ट सौंदर्यवती तसेच सर्वोत्कृष्ट उखाण्याचा पुरस्कार स्नेहल अधाजे यांना देण्यात आला असून, सरप्राईज नेम म्हणून सिध्दी वारके, कल्पना साठे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आरती पाठक यांनी केले.










