जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी

‘टॅलेंट हंट’ कार्यक्रमाचे आयोजन; स्टार खेळाडू, प्रशिक्षक राहणार उपस्थित

| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 23 व 24 मे 2026 रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर चौदा वर्षाखालील उदयोन्मुख मुलांसाठी टॅलेंट हंट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व अकॅडमी, क्लब पासून अगदी गल्लीतले फलंदाज व गोलंदाज ते स्टेडियमचा स्टार,असा प्रवास करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सर्व युवा क्रिकेटपटूंसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रायगड जिल्ह्यातील चौदा वर्षाखालील 01/09/2012 वर्षानंतर जन्मलेल्या वयोगटातील मुलांसाठी एका विशेष क्रिकेट टॅलेंट हंट कार्यक्रमाचे आयोजन प्रथमच रायगड जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी आरडीसीएतर्फे करण्यात आले आहे. टॅलेंट हंट कार्यक्रमामध्ये जलद गती गोलंदाज, तंत्रशुद्ध फलंदाज याचे शास्त्रोक्त मूल्यमापन करून घेता येईल. गोलंदाजी सोबतच फलंदाजीतील कसब दाखवण्यासाठीही खेळाडूंना व्यासपीठ मिळणार आहे. या निवड प्रक्रियेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड रायगडच्या संभाव्य संघात केली जाणार असून, निवड झालेल्या खेळाडूंना रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दिग्गज खेळाडूंची उपस्थिती आणि निवड समिती-
या कार्यक्रमाला महाराष्ट्र क्रिकेट संघातील स्टार खेळाडू व प्रशिक्षक मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे तरुण खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच ते खेळाडूंची निवड आणि मार्गदर्शन करणार असून, अनुभवी प्रशिक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची ही खेळाडूंना दुर्मिळ संधी असेल. रायगड जिल्ह्यातील चौदा वर्षाखालील जास्तीत जास्त मुलांनी टॅलेंट हंट कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन आपली नोंदणी दिनांक 21 मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. टॅलेंट हंट कार्यक्रमा संबंधी अधिक माहितीसाठी सहसचिव जयंत नाईक 9561099735,अरुण शिंदे 9527608080, देवेंद्र पाटील 9226951176 यांच्याशी संपर्क साधावा.
जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हा
रायगड जिल्ह्यातील जास्तीतजास्त युवा खेळाडूंनी टॅलेंट हंट कार्यक्रमामध्ये आपली नोंदणी करण्याचे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदीप नाईक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Exit mobile version