परंपरेचे जतन करण्यासाठी शासनाचा पुढाकार
। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
परंपरेचे जतन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. पैठणी साडी, हिमरू शाल, करवतकाठी साडी, घोंगडी, खणासारखे पारंपरिक वस्त्र विणणार्या विणकरांना मदतीचा हात मिळणार आहे. कारण महाराष्ट्रातील या पाच प्रमुख पारंपरिक वस्त्रोद्योग विणकरांना राज्य शासनाच्यावतीने आता ‘उत्सव भत्ता’ दिला जाणार आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने यासाठी निर्णय घेतला आहे. यामध्ये पुरुष विणकरांना 10 हजार, तर महिलांना दीडपट अधिक म्हणजे 15 हजार रुपये इतका भत्ता मिळणार आहे. यासाठी 7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या निर्णयामुळे उतारवयात विणकरांच्या जीवनात आशेचा धागा जोडला जाणार असून, राज्यातील पारंपरिक वस्त्रोद्योगाचे जतन, संवर्धन होण्यास मदत होणार आहे.
ही योजना राज्यभर राबवली जाणार असून त्यासाठी 7 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यास अनुसरून आता राज्यातील पैठणी साडी, हिमरू शाल, करवतकाठी साडी, घोंगडी व खण फॅब्रिक्स या पाच पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील विणकारांना प्रतिपुरुष 10 हजार रुपये उत्सव भत्ता देणार आहे. महिला विणकरांना हा भत्ता आणखी पाच हजार रुपयांनी वाढवून दिला जाणार आहे.
उत्सव निधी विणकारांच्या खात्यात होणार जमा
याकरिता राज्य शासनाने 7 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. यांपैकी 60 टक्के म्हणजे 2 कोटी 19 लाख रुपयांचा निधी वस्त्रोद्योग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. सहायक संचालक, वस्त्रोद्योग आयुक्तालय यांना निधी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून, तर वस्त्रोद्योग आयुक्तांना नियंत्रक अधिकारी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. उत्सव निधी विणकारांच्या खात्यामध्ये थेट जमा केला जाणार आहे.
विणकारांच्या कौशल्यामुळे पैठणी साडीचा लौकिक देश-परदेशात पोहोचला आहे. अलीकडे या व्यवसायामध्ये अन्य व्यावसायिक आले आहेत. पारंपरिक वस्त्रोद्योग विणकरांवर हे एक प्रकारचे अतिक्रमण आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक विणकारांना उत्सव भत्ता देऊन सन्मान करणे स्वागतार्ह आहे. परंतु, यासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करताना पारदर्शकता राखावी. या व्यवसायात पिढ्यान् पिढ्या कारागिरी केलेल्यांचा शोध घ्यावा. या योजनेतून पारंपरिक वस्त्रोद्योगाचे संवर्धन होईल.
– कल्पेश साळवे,
पैठणी विणकर, येवला