| पेण | प्रतिनिधी |
मे. हावरे ग्रँड म्हणजे एक गृहनिर्माण व्यवसायातील नाव. मात्र, नाम बडे और दर्शन छोटे! पेण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मे. हावरे ग्रँड यांच्यातर्फे अनिल कुमार सिंघ व उज्ज्वला सतीश हावरे यांच्या नावे सर्वे नं. 256अ/1, 256अ/2 हे सातबारे आहेत. त्याच्याच शेजारी असलेल्या 256अ/3 हा महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्र विकास या नावाने म्हाडाचा सातबारा आहे. हावरे गु्रपने स्वतःची जागा सोडून महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्राच्या जागेवर बांधकाम केले आहे, ते ही बेकायदेशीरपणे. पेण नगरपालिकेतून कोणत्याही प्रकारचा बांधकाम परवाना घेतलेला नाही, अशी माहिती आहे. स्वतःच्या मर्जीने म्हाडाच्या जागेत बिनधास्तपणे बांधकाम केले आहे. तसेच लगतच्या शेतकर्यांचेदेखील ये-जा करण्याचे मार्ग अडविले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
हावरे ग्रुप आणि म्हाडाच्या शेजारी मधुकर कृष्णा पाटील यांच्या स्वतःच्या मालकीची जागा आहे. त्यांच्या जागेवर जाण्यासाठी असलेला रस्ता हावरे ग्रुपने बंद केला असून, म्हाडाच्या जागेवर बांधकाम केल्याची तक्रार मधुकर पाटील यांचे चिरंजीव अंतोरे सरपंच अमित पाटील यांनी पेण तहसीलदार, पेण उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी रायगड, गृह राज्यमंत्री यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी सुनावणी लावली होती, परंतु, हावरे ग्रुपकडून आलेला इसम मंगेश चव्हाण हा बेछूटपणे खोटं बोलून तहसीलदारांना चुकीची माहिती पुरवित होता. तर, आपल्या अवैध बांधकामाचे समर्थन करत ते बांधकाम तात्पुरते आहे, असही निर्लज्जपणे तहसीलदारांना सांगत होता. घटनास्थळी बांधकाम पाहिल्यावर ते तात्पुरते आहे, असे बोलणे म्हणजे सरळ-सरळ तहसीलदारांना फसविण्यासारखेच होते.
आमच्याकडेही तक्रारी अर्ज आला आहे. आम्ही चौकशी केली असता हावरे ग्रुपला 256अ/1,2,3 मध्ये कोणत्याही प्रकारचा बांधकाम परवाना दिलेला नाही. बांधकाम परवाना न घेता जर बांधकाम करत असतील, तर कायदेशीर कारवाई केली जाईल. मी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना पंचनाम्यासाठी पाठवतो.
जीवन पाटील,
मुख्याधिकारी
सर्वसामान्यांकडून थोडीशी जरी चुकी झाली, तरी अधिकारी कायद्याचा बडगा दाखवतात. पण, म्हाडाच्या जागेमध्ये न कुणाला घाबरता हावरे ग्रुप बांधकाम करीत आहे. यावरुन अधिकारी आणि हावरे ग्रुप यांचा हिंतसंबंध तर नाही ना? असेच माझ्यासारख्या शेतकर्याला प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्या जागेत जाण्यासाठी रस्ता बंद केला असून, त्यावर बांधकाम सुरु केले आहे. तक्रार करुनही अधिकारी जर दुर्लक्ष करीत असतील, तर याचाच अर्थ अवैध बांधकामाला अधिकारीवर्गाचा आशीर्वाद आहे.
अमित पाटील,
अंतोरे सरपंच (तक्रारदार)
बेकायदेशीर बांधकाम असल्याचे आढळून आल्यास याबाबत तात्काळ पंचनामे करुन बांधकाम काढण्यास सांगण्यात येईल.
तानाजी शेजाळ,
तहसीलदार