। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी शहरातील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या कामाचे नियोजन नसल्याने वारंवार होणार्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. तुकड्या तुकड्याने हे काँक्रिटीकरण होत असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. काम सुरू होण्याआधीच रस्ते बंद केले जात आहेत. जेल नाक्याजवळील आंबेडकर पुतळा येथे एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्याआधी नगर परिषदेने सतत तुटणार्या नळाच्या पाईपच्या कामासाठी खोदलेले खड्डे तसेच ठेवले असल्याने वाहतूक धोकादायक ठरत आहे. एकीकडे वाहन चालकांवर बंधने आली असतानाच रस्त्यावरील फेरीवाल्यांना मात्र नगर परिषदेचे अभय आहे. त्यामुळे या सगळ्या रहदारीतून नागरिकांना वाहने हाकणे कठीण होत आहे.
पोलीस खात्याकडून वाहतुकीचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, नगरपरिषद नियोजनाच्या बाबत हात झटकून टाकत आहे. विशेष म्हणजे एका बाजूने वाहतूक सुरू असतानाच फेरीवाले मात्र त्या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. एवढेच नव्हे, तर रस्त्याची मोकळी जागा ही त्यांनी व्यापून टाकली आहे. अर्धवट कामामुळे रस्त्यावर खडी पसरली असून ती वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. मात्र, नगर परिषदेचे प्रशासन त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे नागरिकांच्या संतापाचे वातावरण आहे.