| पाली | वार्ताहर |
भारतीय प्रजासत्ताक दिन देशभर उत्साहात साजरा होत असताना शासन निर्णयाप्रमाणे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करणे सक्तीचे असताना देखील तहसील कार्यालयात ते न झाल्याने हे प्रकरण प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना भोवणार, अशी चर्चा आहे. संविधान उद्देशिकेचे वाचन न करणे हा विश्वरत्न, भारतरत्न, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान नव्हे का, असा संतप्त सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने विचारला आहे. दरम्यान, प्रांत अधिकारी यांनी आम्हाला शासन निर्णय नाही, आम्हाला वरून आदेश नाहीत, असे उत्तर दिल्याने आंबेडकर अनुयायांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
76 वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभर उत्साहात साजरा होत असताना सुधागड तालुक्यात मात्र संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन न करून संविधान आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याची भावना ध्वजारोहणाला उपस्थित असलेल्या जनतेमध्ये दिसून आली. सुधागड तालुक्यात जी सरकारी कार्यालये आहेत, त्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. मात्र, सुधागड तालुक्यातील तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहणाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले नाही. याचा जाब येथील उपविभागीय अधिकारी सायली ठाकूर व तहसीलदार उत्तम कुंभार यांना विचारले असता, आज संविधानाचे वाचन केले जात नाही. तसा आम्हाला शासन निर्णय नाही आणि वरिष्ठांचे आदेशही नाहीत, असे उत्तर देऊन प्रश्नकर्त्यांची बोलवण केली. यासंदर्भात येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना जाब विचारण्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीव्र आंदोलन करणार, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेश संघटक रवींद्रनाथ ओव्हाळ व तालुकाध्यक्ष राहुल सोनावले यांनी दिला आहे.
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी सायली ठाकूर यांच्याकडे फोनद्वारे बातचीत केली असता, संविधान उद्येशिकेचे सामूहिक वाचन करण्याचा शासन निर्णय व तसा आदेश आम्हाला नसल्याचे सांगण्यात आले. तर, सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याशी संपर्क केला असता याबाबत बोलणे होऊ शकले नाही.