। नाशिक । प्रतिनिधी ।
पेठरोडवरील राहू हॉटेलपासून काही अंतरावर भरधाव वेगातील मिक्सर ट्रकने धडक दिल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेले दोघे ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
गोवर्धन गोसावी (रा. पुलेनगर, विजय चौक, पेठरोड), पांडु लाखन (रा. वडुली, ता. कपराडा, जि वलसाड, गुजरात) असे अपघातातील मृतांची नावे आहेत. रविवारी (दि. 26) सायंकाळी सहाच्या सुमारास पेठरोडवरील वेरुळकर बंगल्याजवळ रस्त्याच्या कडेला छोटा हत्तीतून भाजीपाला खाली उतरवून चालक गोवर्धन गोसावी यांना पांडू लाखन हे भाड्याचे पैसे देत होते. त्यावेळी नाशिककडून पेठ रोडकडे जाणार्या भरधाव मिक्सर ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेले गोसावी, पांडु लाखन व गंगाराम ओतार यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गोसावी आणि पांडु लाखन हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संशयित मिक्सर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.