धनदांडग्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोलमांडला येथे खारफुटीवर मातीचा बेकायदा भराव टाकून कांदळवने कायमची नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणी धनदांडगे यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी बोर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच सपना संजय जायपाटील यांनी विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकण, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारीद्वारे केली होती. त्याचवेळी कारवाई न केल्यास मोर्चा काढू, असा इशाराही देण्यात आला होता.
मुरुड तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी तुषार काकडे, कांदळवन कक्ष दक्षिण कोकण वनपाल अशोक शिंदे, प्रादेशिक वनविभागाचे वनपाल वैभव शिंदे, वनरक्षक पृथ्वीराज चव्हाण, बॉम्बे इन्व्हरमेंटल अॅक्शन ग्रुपचे प्रकल्प अधिकारी अनिल पंडित, पोलीस अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन स्थळ पाहणी केली. यावेळी सरपंच सपना जायपाटील, स्थानिक ग्रामस्थ अजय भोईर, ग्रामस्थ महिला संख्येने उपस्थित होत्या.
या कांदळवनामधील क्षेत्रामध्ये बोर्ली कोळी व आदिवासी समाज बांधव खेकडे, चिंबोरे पकडून तसेच कालवे काढून, निवट्या पकडून उदरनिर्वाह करीत आहेत. असे असताना धनदांडगे याठिकाणी बेकायदा माती भराव टाकून कांदळवने नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे आगरी, कोळी, आदिवासी समाजावर उपासमारीची वेळ येणार असून, सदर ठिकाणी भरावामुळे पावसाळ्यात पाण्याचा मूळ प्रवाह अडून बोर्ली गावात समुद्राच्या भरतीचे पाणी शिरुन संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन याठिकाणी कांदळवनाची तोड करून टाकण्यात आलेला भराव काढून टाकावा व पावसाळ्यामध्ये नदीचा प्रवाह, खाडीचा प्रवाह, समुद्राचा प्रवाह एकत्र येऊन बोर्ली गावातील कोळी बांधवांच्या मच्छिमार बोटींना धोका निर्माण होणार आहे. या संभाव्य पुराच्या धोक्यापासून वाचवावे अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला जनआंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.