रोह्यात जमीन दलालांविरोधात गुन्हा दाखल
| रोहा | वार्ताहर |
औद्योगिकीकरण, रेल्वे, महामार्ग, मुबलक पाणी, पर्यटनस्थळ इत्यादी बाबींमुळे रोह्यात जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. त्यात दलाल बोगस व्यवहार करून व जमीन मालकांना चुना लावून ‘छप्पर फाडके’ माया लाटत असल्याचे अनेक प्रकार रोह्यात घडले आहेत. असे असताना जमीन दलालांचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.
पाच एकरहून अधिक जमिनीचे रजिस्टर साठेकरार करून जमीन हिशेदारांच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा केल्यानंतर जमीन दलालाने सदर जमीन परस्पर ओळखीच्या तिर्हाईत इसमांना विकल्याची बाब मूळ मालकाला समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेबाबत संतोष शांताराम धनकावडे (रा. धनकवाडी, पुणे) यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतल्यानंतर चौकशीअंती रोहा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात जमीन मालक महिला व तिचा मुलगा, जमीन दलाल व खोटा खरेदीखत करणारे तीन धनदांडगे इसमांचा समावेश असल्याने ते सर्व आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रोहा तालुक्यातील घोसाळे जवळी सुखदरवाडी येथील सुनीता रामजी पवार यांच्या मालकीची पाच एकर 11 गुंठे सामाईक शेतजमीन आहे. जमीन मालक महिलेने दलालाला सोबत घेऊन सदर जागा संतोष शांताराम धनकवडे (रा. पुणे) यांच्याशी व्यवहार करण्याच्या दृष्टीने रजिस्टर साठेकरार केले. नियोजित जमिनीपैकी काही क्षेत्र वनक्षेत्रात येत असल्याने वन खात्याकडून ना हरकत दाखला मिळावा म्हणून संतोष धनकवडे यांनी वन खात्याकडे रीतसर अर्ज केला होता. असे असताना जमीन दलाल ऋषिकेश जैन याने इतर लोकांना हाताशी धरून वन खात्याकडून परस्पर दाखला काढून सदर जमीन पनवेल येथील ओळखीच्या इसमांना परस्पर विकली व यातून काही रक्कम जमीन मालकांनादेखील दिली.
तर, दुसरीकडे या जमिनीच्या पहिल्या व्यवहारापोटी जमीन मालक सुनीता पवार व तिचा मुलगा आशिष पवार यांच्या बँक खात्यात संतोष धनकवडे यांनी 26 लाख 70 हजार रु. जमा केले. असे असताना जमीन दलाल ऋषिकेश बाबुलाल जैन (रा. तळाशेत-इंदापूर, ता. माणगाव) याने वन खात्याकडून परस्पर ना हरकत दाखला घेऊन सदर जमीन ओळखीच्या इसमांना विकल्याची धक्कादायक बाब समोर आली. या घटनेनंतर रोहा पोलीस ठाण्यात सुनीता रामजी पवार, आशिष रामजी पवार (दोन्ही रा. सुखदरवाडी, ता. रोहा), ऋषिकेश बाबुलाल जैन (रा. तळाशेत-माणगाव), सुरेश शिवाजी शाहा, जयदीप अशोक शाहा, कल्पेश हसमुखलाल ठक्कर, आनंद शांतीलाल नाथानी (सर्व रा. पनवेल) या सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सपोनि आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा अविनाश पाटील अधिक तपास करीत आहेत.