दिविलच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा घोळ

| पोलादपूर |प्रतिनिधी |
दिविल,ता.पोलादपूर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वोटींग मशीनद्वारे झालेल्या मतमोजणीनंतर विजयी झालेल्या उमेदवारांची मते बदलली आणि दुसर्‍याच उमेदवारांना मते वाढवून निवडणूक यंत्रणेकडून विजयी घोषित करण्यात आल्याचे उघड झाले आहे. हे सध्या कागदोपत्री विजयी झालेले दोन्ही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे असल्याचे तालुक्यात सांगितले जात आहे.

दिविल ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमधील दोन उमेदवारांच्या विजयी घोषित करण्यासंदर्भात हा घोळ झाला आहे. तहसिल कार्यालयाच्या या घोळामुळे विजयी उमेदवार कोण, हा विषय गंभीर चर्चेचा झाला आहे. पोलादपूर पोलीसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या अहवालानुसार दिविलचे विजयी उमेदवार आणि निवडणूक विभागाच्या कागदपत्रांनुसार विजयी उमेदवार यांच्यामधील तफावतीमुळे जिंकले कोण? हे फक्त निवडणूक विभागाच्या कागदपत्रांनुसार ठरणार आहे.

निवडणूक विभागाच्या दिविल ग्रामपंचायतीच्या निकालाच्या जोडपत्र 21 नुसार सर्वसाधारण स्त्री आरक्षणाच्या तीन महिला उमेदवारांपैकी क्रमांक दोनच्या सुवर्णा भाऊ भिलारे यांना एकूण मते 344 पैकी 171 मते प्राप्त झाल्याने त्या विजयी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर क्रमांक एकच्या उमेदवार रूपाली तुषार पवार यांना 25 मते तर क्रमांक 3च्या मनिषा निलेश शिंदे 146 आणि नोटा मते 2 अशी आकडेवारी दिसून येत आहे. याच प्रभाग 1 मधील अनुसुचित जाती आरक्षणासाठीच्या सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीतील क्रमांक 1 चे उमेदवार जंगम मंगेश देवलिंग यांना एकूण मते 344 पैकी 189मिळाल्याचे जाहिर करून विजयी घोषित करण्यात आले आहे. याच प्रभागातील क्रमांक 2 चे उमेदवार मोरे प्रमोद चंद्रकांत यांना 09 आणि क्रमांक 3चे उमेदवार सविता सदाशिव सोनावणे यांना 145 तसेच नोटा मते 01 अशी असल्याचे दिविल ग्रामपंचायतीच्या निकालाच्या जोडपत्र 21 नुसार निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती घेतली असता पंचायत समितीच्या कृषी विभागाचे अधिकारी वसावे यांनी हे काम केले असून पोलादपूर तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेने या निकालाकामी अक्षम्य दिरंगाई करीत कोण विजयी कोण पराभूत हे स्पष्ट होण्यास अडथळा निर्माण केला आहे.

Exit mobile version