डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना ठेकेदाराकडून तडा

ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पायऱ्यांवरून फिरवला जेसीबी

| महाड | प्रतिनिधी |

महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या जलशुद्धीकरण कामासाठी तळ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी तळ्याच्या पात्रात जेसीबी थेट मुख्य पायऱ्यांवरून उतरवण्यात आल्याने पायऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पायऱ्यांवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळ्याचे पाणी प्राशन करून सत्याग्रह केला होता. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

चवदार तळ्याच्या पायऱ्यांचे काम काही दिवसांपूर्वी पुरातत्त्व विभागाने नव्याने केले होते. आता तळ्याच्या सुशोभीकरणासाठी सरकारकडून 55 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून तळ्याचे पाणी शुद्धीकरण व इतर कामे केली जाणार आहेत. याकरिता गाळ काढणे महत्त्वाचे असल्यामुळे तळ्याच्या पात्रामध्ये जेसीबी उतरवण्यात आला.

परंतु, याबाबत कोणतीही परवानगी न घेता तळ्याचे गाळ काढण्याचे काम हाती घेतलेल्या ठेकेदारांनी थेट पायऱ्यांवरून जेसीबी पात्रामध्ये उतरवला. यामुळे या पायऱ्या तुटल्या. परिणामी, त्यावर झालेला लाखोंचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. पायऱ्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे.

कारवाईची मागणी
वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सखाराम सकपाळ यांनी याप्रकरणी मुख्याधिकारी व प्रांताधिकारी यांना लेखी पत्र देऊन याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत नगरपालिकेचे अभियंता प्रवीण कदम यांनी नुकसान झालेल्या पायऱ्यांचे काम या ठेकेदाराकडून करून घेतले जाईल, असे सांगितले.
Exit mobile version