….ना घर का न घाट का! शिंदे गटातील आमदारांची अवस्था

| मुंबई | प्रतिनिधी |
सरकारमध्ये अजित पवार यांची एन्ट्री झाल्यापासून शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. नव्या सत्ता समीकरणांनुसार शिंदे गटाच्या वाट्याला आणखी जेमतेम तीन ते चार मंत्रिपदे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यात आपली वर्णी लागावी, यासाठी शिंदे गटातील आमदारांतच चुरस निर्माण झाली आहे. काही आमदारांनी गेले वर्षभर ज्यांना मंत्रिपद उपभोगता आले, त्यांना हटवून इतरांना संधी द्या, अशी जाहीर मागणी केली आहे. तर काहींनी मातोश्रीवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा खा. विनायक राऊत यांनी केला आहे. मात्र बंड करणाऱ्यांना ठाकरे गट स्वीकारेल कि नाही, याबाबत ठाकरे गटातील वरिष्ठांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे शिंदे गटातील अस्वस्थ आमदारांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’, अशी झाली आहे.

राष्ट्रवादीसोबत काम करायचे नाही, म्हणून बंड केले. मा पुन्हा राष्ट्रवादीच नशिबात आल्यामुळे शिंदे गटातील काही आमदारांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली आहे. अशातच अजित पवारांची सरकारमध्ये एन्ट्री होताच त्यांना मंत्रिपदं मिळाल्यामुळे होतो तिथं बरे होतो, असं मत शिंदे गटातील आमदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे.

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला नक्की संधी मिळेल, अशी स्वप्नं रंगवत असलेल्या शिंदे गटातील आमदारांचे मनसुबे राष्ट्रवादीच्या समावेशामुळे पार धुळीला मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटातील आमदारांचा एक गट पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याविषयी चर्चा करत असल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, अजितदादा आणि कंपनीने तिकडे उडी मारली त्याच दिवशी शिंदे गटातील आमदारांनी बंडखोरीच्या हालचाली सुरु केल्या. आमदारांचा हा उद्रेक थांबवताना एकनाथ शिंदे यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक आमदार म्हणत आहेत, आम्ही ज्या घरात होतो, तिथेच बरं आहोत. ‘मातोश्रीने आम्हाला साद घातली तर आम्ही नक्की त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ’, असं वक्तव्य एका मंत्र्याने केले. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथून निरोप येत आहेत. येथील आमदारांमध्ये आपण ‘होतं तिथेच बरं होतं’, अशी चर्चा रंगली आहे. मातोश्रीची क्षमा मागून परत जावे का, याबद्दल संबंधित आमदारांमध्ये विचारविनिमय सुरु असल्याची माहिती आम्हाला समजल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

Exit mobile version