तळीये गावावर दुःखाचा डोंगर

दरडीखाली गाडली गेली 32 कुटुंबे , 38 मृतदेह हाती
दोन महिला गंभीर जखमी
      
महाड | जुनेद तांबोळी |
रायगड जिल्‍हयातील महाड तालुक्‍यात दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्‍या तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळून ही कुटुंबे मातीच्‍या ढिगारयाखाली गाडली गेली. यातील 38 जणांचे मृतदेह स्‍थानिक नागरीक आणि पोलीसांनी बाहेर काढले. दोन महिलांना वाचवण्‍यात यश आले असले तरी त्‍या गंभीर जखमी आहेत. अजूनही अनेकजण या ढिगारयाखाली असल्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. दरडीच्‍या रूपाने तळीये गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महाड आणि पोलादपूर तालुक्‍यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. या पावसाने तळीये गावच्‍या मागील बाजूस असलेल्‍या डोंगराची माती भुसभुशीत झाली .आणि गुरूवारी संध्‍याकाळी साडेचार वाजण्‍याच्‍या सुमारास हा मातीचा ढिगारा खाली कोसळला यात गावातील 32 घरे गाडली गेली.
रात्री उशिरापर्यंत रायगड जिल्‍हा प्रशासनाला याची खबरच नव्‍हती . वीजपुरवठा खंडीत झाल्‍यामुळे संपर्क करणेही कठीण झाले. रात्री पोलीस प्रशासनाने तेथे पोहोचण्‍याचा प्रयत्‍न केला . परंतु ठिकठिकाणी आलेले पुराचे पाणी कोसळलेल्‍या छोटयामोठया दरडी यामुळे पोहाचणे शक्‍य झाले नाही. सकाळी पुराचे पाणी कमी झाल्‍यानंतर पोलीस त्‍या ठिकाणी पोहोचले. स्‍थानिक नागरीकांच्‍या मदतीने त्‍या ठिकाणी बचाव आणि शोधकार्य सुरू केले . पाऊस कोसळत असतानाही ग्रामस्‍थांनी 38 जणांचे मृतदेह बाहेर काढले. या आपत्‍तीतून दोन महिला बचावल्‍या असल्‍या तरी त्‍या गंभीर जखमी झाल्‍या आहेत. त्‍यांच्‍यावर महाड येथे उपचार सुरू आहेत.
या पावसात एनडीआरएफ किंवा तटरक्षक दल यापैकी कोणतीच बचाव पथके गावात पोहोचू शकली नव्‍हती . ग्रामस्‍थांनीच शोधकार्य सुरू ठेवले. रायगडच्‍या पालकमंत्री आदिती तटकरे , विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर , माजी मंत्री गिरीश महाजन , आमदार भरत गोगावले यांनी बचावकार्य सुरू असतानाच गावाला भेट दिली आणि परीस्थितीची पाहणी केली.
प्रवीण दरेकर भडकले .
हे बचाव कार्य सुरू असताना प्रशासकीय यंत्रणागावात वेळेवर पोहोचू शकली नाही. त्‍यामुळे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली . 80 लोक दरडीखाली गाडले गेले असताना प्रशासनातील एकही अधिकारी पोहोचू नये ही बाबत अतिशय गंभीर असून त्‍यांच्‍यावर कारवाई करावी अशी मागणी त्‍यांनी केली.
गावावर शोककळा
या दुर्घटनेमुळे तळीये गावावर शोककळा पसरली आहे. स्‍थानिकांनी दिलेल्‍या माहितीनुसार या 32 घरांमध्‍ये जवळपास 72 लोक रहात होते. जे 38 मृतदेह बाहेर काढण्‍यात आले . यात लहान मुलांसह वृदध आणि महिलांचाही समावेश आहे.  डोंगराच्‍या कुशीत वसलेल्‍या आणि गुण्‍यागोविंदाने राहणारे ग्रामस्‍थ या मन हेलावून टाकणारया घटनेने सुन्‍न झाले आहेत.  

Exit mobile version