संतोष दिवकर यांचा जिल्हा परिषदेतर्फे सन्मान
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन सोमवारी (दि.24) करण्यात आले. यावेळी विविध पुरस्कार प्राप्त 36 शेतकऱ्यांसह 14 प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. रोहा तालुक्यातील यशवंतखार गावचे तरुण प्रगतशील शेतकरी संतोष काशिनाथ दिवकर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
संतोष दिवकर गेल्या 15 वर्षांपासून वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला आधुनिकता, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक गोआधारित पद्धतीची जोड देत शेती करत आहेत. आई-वडील, मोठा भाऊ व त्यांचे कुटुंब तसेच स्वतःचे कुटुंब अशा एकत्रित कुटुंबाच्या सहभागातून भातशेतीसोबत विविध पूरक व्यवसाय उभे करून त्यांनी शेतीला उत्पन्नाचे सक्षम साधन बनविले आहे.
दिवकर यांच्या शेतीतील उल्लेखनीय कामाची यापूर्वीही विविध संस्थांनी दखल घेतली आहे. सेंद्रिय शेतीसाठी महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार 2021, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा आदर्श पुरस्कार 2020, रायगड जिल्हा प्रेस क्लबचा आदर्श पुरस्कार 2018, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचा सन्मान 2024, आयसीएआर कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेचा फेलो शेतकरी सन्मान 2024, तसेच विविध सामाजिक व शेतकरी संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
या सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत वारगुडा, सदस्या ज्योती नागावकर, सदस्या नलिनी लोखंडे, माणगाव पंचायत समिती सभापती विलास शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे, कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन यांच्यासह पुरस्कारप्राप्त शेतकरी, अधिकारी व पत्रकार उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देतानाच महिला शेतकरी सक्षमीकरण योजनेची माहिती आणि खत खरेदी-विक्रीसाठीच्या नवीन प्रणालीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शेतीत नव-नवीन प्रयोग
भातशेतीबरोबरच विविध फळबागांची लागवड, भाजीपाला उत्पादन, शेततळ्यात मत्स्यपालन, जैवप्रवाही पद्धतीने मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय, गावठी कोंबडीपालन आणि शेळीपालन असे विविध उपक्रम ते राबवितात. विशेष म्हणजे जीवामृत, गोकृपामृत, दशपर्णी अर्क, कंपोस्ट खत, गांडूळ खत यांसारख्या सेंद्रिय निविष्ठा ते स्वतः तयार करतात. आपल्या प्रयोगातून मिळालेले अनुभव ते परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही देत असून शेतीमध्ये नव्या प्रयोगांना प्रोत्साहन देत आहेत.
