स्मशानभूमीजवळ खराब मासाची रास

नेरळ मधील प्रकार
मांस विक्रेत्यावर कारवाईची मागणी

। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ मोहाचीवाडी परिसराला लागून असणार्‍या स्मशानभूमी शेजारी मोठ्या प्रमाणात मांस विक्रीते हे उरलेले हाडे, मांस येऊन टाकत असल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरवून येथे दुर्गंधी सुटू लागली आहे. त्यामुळे येथील परिसरात व हिंदू स्मशान भूमीत दहन विधीसाठी येणार्‍या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने, या परिसरात कचरा टाकणार्‍यावर नेरळ ग्रामपंचायतीने कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.
रायगड जिल्ह्यात येत असलेल्या कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत ही नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. परंतु सध्या नेरळ ग्रामपंचायत परिसरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत असल्याने पुन्हा एकदा नेरळ ग्रामपंचायत चर्चेत आली आहे. नेरळ मोहाचीवाडी परिसराला जोडण्यात येणार्‍या पुला जवळील हिंदू स्मशान भूमी परिसरात गावातील मांस विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी हे सायंकाळी प्राण्यांचे हाडे, मांस, सडलेली घाण ही येऊन टाकत असल्याने येथे घाणीचे साम्राज्य पसरू लागले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटू लागली आहे. यामुळे येथील परिसरातील नागरिक साथीच्या रोगाला बळी ठरत असून, हिंदू स्मशान भूमी शेजारीच ही घाण टाकत असल्याने येथे दहन विधीसाठी येणार्‍या नागरिकांना देखील या घाणीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिक आता याबाबत संताप व्यक्त करत असून, दुर्गंधी पासरविण्यांवर कारवाईची मागणी करत आहेत.

Exit mobile version