उदयोन्मुख क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ; महापालिकेच्या पुढाकारातून प्रशिक्षण केंद्राची निर्मिती

मे. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनशी करार
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल क्षेत्रातील अनेक मुलांमध्ये क्रिकेटचे टॅलेंट आहे. परंतु, त्यांना व्यासपीठ नाही, पनवेल महापालिकेमुळे हे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. भविष्यात येथील मुलेही भारतीय क्रिकेट टीममध्ये खेळू शकतील, असा विश्‍वास विख्यात क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.

महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती-ब, प्रभाग क्र.16 मधील भूखंड क्र. 28, सेक्टर 11, नवीन पनवेल (पूर्व) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र (अकॅडमी) पनवेल महापालिकेच्यावतीने लवकरच उभारण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मे. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनशी करार आयुक्त दालनाशेजारील बैठक कक्षात करण्यात आला. यावेळी दिलीप वेंगसरकर, महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पनवेल शहर आणि तालुक्यातील किक्रेटवीरांसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई व इतरत्र जावे लागत होते. महापालिका उभारत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे नागरिकांची ही अडचण दूर होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये विख्यात किक्रेटपटू दिलीप वेंगसर यांचे मार्गदर्शन क्रिकेटपटूना मिळणार आहे. यासाठी मे. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनशी महापालिकेलेने करार केला आहे. या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक वर्षी 10 ते 19 वयोगटातील किमान 101 विद्यार्थांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामधील पन्नास टक्के पमपा क्षेत्रातील, पंचवीस टक्के रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पंचवीस टक्के महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थी असणार आहेत.

Exit mobile version