। पनवेल । प्रतिनिधी ।
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीनिमित्त घरे, गृहनिर्माण सोसायट्या आणि दुकाने सजविण्यासाठी नागरिकांकडून आकाशकंदील, पणत्या, विद्युत माळा आणि विविध सजावटीच्या वस्तूंची खरेदी केली जात आहे. बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी आणि आकर्षक आकाशकंदिलांचे विविध प्रकार दाखल झाले असून, ग्राहकांकडून त्यांना चांगली पसंती मिळत आहे.
यंदा बाजारात पारंपरिक कागदी कंदिलांसोबतच कापड, बांबूच्या पट्ट्या आणि विविध साहित्यांपासून तयार केलेले आकर्षक आकाशकंदील उपलब्ध आहेत. तारेच्या आकाराचे, गोलाकार, चौकोनी तसेच बहुरंगी कंदिल ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कमळाच्या आकारातील, मोराच्या रचनेतील आणि राजवाड्यांच्या प्रतिकृती असलेल्या कंदिलांनाही मागणी आहे. नक्षीकाम आणि सजावटीच्या झालरी असलेल्या कंदिलांना विशेष पसंती मिळत आहे.
आकार, वापरलेले साहित्य आणि सजावटीच्या प्रकारानुसार आकाशकंदिलांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. साधे कागदी कंदील 200 ते 400 रुपये, मध्यम आकाराचे आकर्षक कंदील 500 ते 1,000 रुपये, तर मोठ्या आकाराचे आणि कलात्मक नक्षीकाम असलेले कंदील 1,200 ते 2,500 रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दिवाळी जसजशी जवळ येत आहे, तसतशी बाजारपेठांमधील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. पारंपरिक आणि आधुनिक सजावटीच्या वस्तूंची वाढती उपलब्धता यामुळे ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत असून, आगामी दिवसांत आकाशकंदिलांच्या विक्रीत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.







