| नागोठणे | प्रतिनिधी |
रिलायन्स कंपनीच्या नवीन प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामामुळे नागोठणे व परिसरातील वाहन चलक व नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी येणाऱ्या व माल वाहतूक करणाऱ्या ट्रक, डंपर, ट्रेलर, कंटेनर यासारख्या अवजड वाहनांमुळे नागोठणे-पोयनाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहन चालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना दररोज मृत्यूच्या छायेतून प्रवास करावा लागत असून रात्रीच्या वेळी तर रस्त्यावरील चिखलामुळे व रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या करण्यात आलेल्या अवजड वाहनांमुळे येथे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या, नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन या प्रकल्पांतर्गत रिलायन्स कंपनीकडून नवीन प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या नवीन प्रकल्पामुळे नागोठणे परिसराला गुजरात राज्यातील जामनगर परिसरासारखे सुजलाम-सुफलाम करण्याचे गाजर कंपनी प्रशासनाकडून स्थानिकांना दाखवले जात आहे. मात्र, असे असतानाच वाहन चालकांच्या व स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.
स्थानिकामध्ये संतापाची लाट
सततच्या त्रासामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संबंधित रिलायन्स कंपनीच्या व्यवस्थापनाने आणि स्थानिक वाहतूक पोलीस प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करून, अवजड वाहनांसाठी आवश्यक ती पार्किंग व्यवस्था करावी आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित करावा, अशी आग्रही मागणी आता जोर धरत आहे.
