चविष्ट माशांसाठी मत्स्यप्रेमींची पहाटेपासून झुंबड
| चणेरा | प्रतिनिधी |
पावसाळ्याची चाहूल लागताच रोहा तालुक्यात पारंपरिक ‘वलगणी’चा हंगाम सुरू झाला असून नदी, नाले, कालवे, डबकी आणि शेतांमधील पाण्याच्या ओघात विविध जातींच्या चविष्ट माशांची रेलचेल पाहायला मिळत आहे. सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसानंतर वलगणीसाठी पहाटेपासूनच तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि मत्स्यप्रेमींनी खांद्यावर पागीर, हातात कांडाळ व कंटाळ घेऊन नदीकाठी जाताना दिसत आहेत.
या हंगामात आरले, कटले, मले, शिवडा, शिंगट्या, दाडां, खड्या, खवल्या यांसारख्या स्थानिक आणि चविष्ट माशांना विशेष मागणी असते. विशेष म्हणजे वलगणीच्या काळात मिळणारे हे मासे अंड्यांनी भरलेले असल्याने त्यांच्या चवीला वेगळीच लज्जत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील घराघरांत सध्या या माशांच्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी रंगू लागली आहे.
पिगळसई, मेंढा, खांब, धाटाव, रोठ बुद्रुक, रोठ खुर्द, निवी, तळाघर, लांढर, बोरघर, वाशी, महादेववाडी, मलखंडवाडी, वरसे आणि तिसे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मासेमारी झाली. दरम्यान, मुठवली गावातील अनिकेत या तरुणाने तब्बल दहा ते बारा किलो वजनाचा शिवडा पकडल्याने संपूर्ण रोहा तालुक्यात त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एवढ्या मोठ्या आकाराचा शिवडा मिळणे दुर्मिळ मानले जात असल्याने त्याच्या या पकडीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
रोहा तालुक्यात पावसाळ्यातील ‘वलगणीचे मासे’ ही केवळ खाद्यसंस्कृती नसून अनेक वर्षांपासून जपली गेलेली लोकपरंपरा आहे. यंदा ही निसर्गाने भरभरून साथ दिल्याने रोहा तालुक्यातील नदी-नाले पुन्हा एकदा गजबजले असून, चविष्ट वलगणीच्या माशांची पर्वणी अनुभवायला मिळत आहे.
मत्स्यप्रेमींचा आनंद द्विगुणित
यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने नदी-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासे आल्याने मत्स्यप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे. तासनतास पाण्यात उभे राहून मासेमारी करण्याची पारंपरिक पद्धत आजही कायम असल्याचे दिसून आले. अनेकांनी सकाळपासूनच नदी, नाले, कालवे आणि शेतातील साचलेल्या पाण्यात मासेमारीचा आनंद लुटला.






