अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या
| कोल्हापूर | प्रतिनिधी |
बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर शाळेतील कर्मचार्यानेच अत्याचार केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात वातावरण तापलं आहे. ही घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरमध्येही असाच एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.कोल्हापूरच्या शिये गावातील रामनगर परिसरातील धक्कादायक घटना आहे. पीडित मुलगी बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या दहा वर्षांची ही मुलगी बुधवारी दुपारपासूनच बेपत्ता होती. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण ती काही सापडली नाही. अखेर गुरुवारी (दि. 22) सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली. हत्या करण्यापूर्वी त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीश्रक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व विभागीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. एकीकडे आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रमहोत असतानाच कोल्हापूरपासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या शिये गावात मात्र घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, श्वान पथकाच्या सहाय्याने तपास सुरू आहे. यामध्ये इतर आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का याचा शोध घेतला जात आहे.
अंबरनाथमध्ये चिमुकलीचा विनयभंग
ठाणे : बदलापूरच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. बदलापूरपासून अगदी काही किलोमीटर अंतर असलेल्या शेजारच्या अंबरनाथ शहरातही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथमध्ये एका 35 वर्षीय इसमाने अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीला शौचालयात नेत, तिला अश्लील चित्रफित दाखवत विनयभंग केला. या घटनेमुळे अंबरनाथ शहरातही खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथ शहरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता तिथे आरोपी संतोष कांबळे याने तिला अश्लील चित्रफित दाखवून विनयभंग करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने 21 ऑगस्टला अंबरनाथ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपी संतोष कांबळे याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.