दुर्घटनेच्यावेळी बनते देवदूतच; 10 हजाराजणांना दिले जीवदान
| खोपोली | संतोषी म्हात्रे |
मुंबई-पुणे महामार्गावर कुठेही कसलाही अपघात होऊ दे.. मग तो रस्त्यावर असो वा खोलदरीत, छिन्नविच्छिन झालेले मृतदेह असोत वा कुणीही जखमी त्यांना तातडीने मदत पुरविण्याचा वसा खोपोलीच्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने जोपासला आहे. आतापर्यंत किमान 10 हजार लोकांचे प्राण या संस्थेने केलेल्या मदतकार्यामुळे वाचले आहेत. ही संस्था देवदूत बनूनच धावत असते.
नुकताच खोपोलीनजिक बोरघाटात एका खाजगी प्रवासी बसला भीषण अपघात होऊन 14 जण ठार झाले. त्यावेळी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने खोल दरीत उतरुन जखमींसह मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना मदत केली होती. अपघातामधून बचावलेल्या एका मुलाने आपल्या मोबाईलमधून पोलीस कंट्रोलरूमशी संपर्क केला. याबाबतची माहिती ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला’ या संस्थेचे सर्वेसर्वा गुरुनाथ साठेलकर यांना मिळताच बचावकार्याला सुरुवात झाली.
साठेलकरांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अपघात ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ठिकाण मिळाले नाही. पुन्हा त्या अपघातग्रस्त मुलाशी संपर्क करून लाईव्ह लोकेशन टाकण्यास सांगितले. नेटवर्क असल्याने त्याने पाठवलेले ठिकाण प्राप्त झाले. दोन महिन्यांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा याच ठिकाणावरून अपघात झाला होता, आणि गुरुनाथ साठेलकर यांच्याच टीमने त्यावेळेस रेस्क्यू ऑपरेशन केले होते. यामुळे खाली दरीमध्ये उतरण्याचा कठीण परंतु योग्य मार्ग माहिती होता. लागलीच साठेलकर यांनी दरीमध्ये उतरण्याचा निर्णय घेऊन उतरण्यास सुरुवात केली. या अपघातामध्ये बचावलेल्या प्रवाशांना दरीमधून बाहेर येण्याचा मार्ग माहीत नव्हता. मात्र गुरुनाथ आणि त्यांचे सहकारी खाली उतरत असताना त्यांच्या टॉर्च लाईटच्या उजेडाच्या दिशेने काही जखमी पुढे येत होते. एका घटकेला बचाव टीम आणि जखमी प्रवाशी समोरासमोर आले तो क्षण एखाद्या हॉरर सिनेमासारखाच होता, असेही साठेलकर यांनी सांगितले.
चोहीकडे अंधार, दरीमधील उष्मा, फुटलेल्या काचा, पत्रे, वादनासाठी सोबत असलेल्या ढोल साहित्याचे तुटलेले तुकडे, बसचा झालेला चक्काचूर या सर्व परिस्थितीमध्ये प्रत्येक दगडावर बसमधील प्रवाशांचा पडलेल्या साहित्यांचा सडा हृदय हेलावून टाकणारे होते. याहीपेक्षा जखमींचं विव्हळणे, मदतीसाठी किंचाळणे, आपला जीव वाचवण्यासाठी गयावया करणं हे चित्र फार वेदनादायी होते. बचाव कार्य सुरू अस्तानाच इतर सहकार्यांशी संपर्क करून, त्यांनाही बोलावण्यात आले. एका तासामध्ये 27 जणांना बाहेर काढण्यात आले. यावेळी अनुभवानुसार ज्यांना प्रथम उपचाराची गरज आहे त्यांना आधी रेस्क्यू करण्याचे ठरवले. हे बचाव कार्य करत असताना दोन जीवांनी बाचावकार्यादारम्यान अर्ध्या वाटेतच हातावर प्राण सोडला. यामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा होता. संपूर्ण वादन ग्रुप असल्याने, यामध्ये सर्वच तरुण मुलं, मुली होते. यातील एका आठ वर्षीय मुलाचा देखील मृत्यू झाला होता. बचाव कार्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे 50 सदस्य आणि शिवदुर्ग या संस्थेचे 50 सदस्य कार्य करत होते. यामध्ये गुरुनाथ साठलकर यांच्या दोन मुली पूजा आणि भक्ती या दोघी देखील काम करत होत्या. प्रत्यक्ष घटनास्थळावरुन जखमींना रुग्णवाहिकेत बसवणे, त्यांना प्रथमोपचार देणे, त्यांची नोंद करून घेणे, माहिती गोळा करणे, मृतदेह उचलणे, शवागृहामध्ये ठेवणे, शवविच्छेदन झाल्यावर त्यांच्या ओळखिनुसार नातेवाईकांच्या ताब्यात देणे, रुग्णवाहिका उपलब्द करून मृतदेह रुग्णवाहिकेत नातेवाईकांसोबत रवाना करणे ही सर्व कामे या दोन संस्थांचे सदस्य अगदी निस्वार्थीपणाने करत होते.
सोशल मिडियाद्वारे संदेश
मागील 35 वर्षांपासून साठेलकर आणि त्यांच्या सहका़र्यांनी आजवर जवळपास दहा हजार लोकांचे जीव वाचवले आहेत. व्हॉट्सएपच्या माध्यमातून अपघातग्रस्तांच्या मदतीला हा ग्रुप तयार केला. काहीही घडल्यास या ग्रुपच्या माध्यमातून माहिती दिली जाते. माहिती मिळताच सर्व सदस्य सक्रिय होतात आणि मग कार्याला सुरुवात होते. एखादा घटनेचा मेसेज आला की तात्काळ तो मेसेज सर्वांना मिळतो. ग्रुपमध्ये पोलीस अधिकारी, अग्निशमन दल सदस्य, सर्पमित्र, जलतरणपटू, मदतीसाठी तत्पर असणारी मंडळी आणि पत्रकार देखील समाविष्ठ आहेत. हे कार्य प्रत्येकजण आपल्या इच्छेने आणि कोणत्याही मोबदल्याशिवाय करत आहे.
संस्थेचा सन्मान व्हावा
प्रत्येकालाच सामाजिक जाणिवेतून काम करण्याची आवड असते असे नाही. मात्र गुरुनाथ साठेलकर यांच्यासारखी माणसे आपल्याला इतरांच्याच मदतीसाठी झोकून देतात आणि प्रत्येक घटनास्थळी जाऊन दुखापत ग्रस्ताचे प्राण वाचवतात हे कार्य महानच आहे. तर वैयक्तिक स्थरावर सुरू केलेले हे काम एका संघटनात्मक कार्याचा विस्तार करून, तब्बल दहा हजार अपघातग्रस्त नागरिकांचे प्राण वाचवते. अशा संस्थेला खर्या अर्थाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानितत करणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा सर्वस्तरातून व्यक्त होत आहे.