| रायगड | खास प्रतिनिधी |
अलिबाग हे शांत, सुसंस्कृत शहर आहे. ही शांती भंग करण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचा प्रकार काही समाजकंटकांनी केला. त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सकल मराठा समाज सामाजिक संस्था, अलिबागच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना देण्याता आले.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही समाजकंटकांनी अपशब्द वापरल्याबद्दल सकल मराठा समाज, अलिबाग या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. समाजा-समाजामध्ये तेढ किंवा वाद निर्माण होईल, तसेच तणावपूर्ण स्थिती निर्माण होईल, अशी आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध त्वरित कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही व कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
हे निवेदन सकल मराठा समाज सामाजिक संस्था, अलिबागचे अध्यक्ष नरेश सावंत, कार्याध्यक्ष अभय म्हामुणकर, सहसचिव अनिल गोळे, युवाध्यक्ष समरेश शेळके, उमाजी केळुसकर, नयन जरंडे, सचिव उल्हास पवार उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सदर संमाजकंटकांवर कायदेशीर कारवाई केली गेली असल्याचे सांगितले.