। रायगड । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन येथील जीवनाबद्दल परिसरात रविवारी (दि. 26) सकाळी एक भला मोठा बोया किनारी लागल्याने खळबळ उडाली होती. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, बाणकोट खाडीतून भरकटलेला हा बोया असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
जीवना बंदर येथे चारचाकी वाहनांचे टायर लावलेला बोया वहात आला आहे, अशी माहिती मेरी टाईम बोर्डाचे कर्मचारी नितेश तांबे यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दिली. त्यामुळे किनारपट्टीवरील भागात खळबळ उडाली होती. बोया पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मेरीटाईम बोर्डाने हा बोया कुठून आला याचा शोध सुरू केला.
श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला ते मंडणगड तालुक्यातील बाणकोट दरम्यान खाडी पुलाच्या पिलरचे काम चालू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट सागरी पोलीस हद्दीत एक बार्ज बुडाला होता. सदरचा बुडालेला बार्ज समुद्रातून वरती खेचण्याकरिता ओहोटीच्या वेळेस बार्जला बोया बांधून भरतीचे वेळेस पाण्यातून बार्ज बाहेर काढता येईल यासाठी बोया बांधला होता. परंतु, हवामान खराब असल्याने बोयाचा दोर तुटून समुद्रात वाहून गेला. हा बोया आज सकाळी श्रीवर्धन येथील किनाऱ्याला लागला. बोयाचा उपयोग बोट सुरक्षित ठेवण्यासाठी बोटीच्या बाजूंना लावण्यात येतो, तसेच एखादी लहान मोठी बोट बुडाली असेल तर त्या समुद्रातून वरती खेचण्यासाठी बलून सारखा उपयोग केला जातो. अशी माहिती श्रीवर्धन येथील मच्छिमार व्यवसायिकांनी दिली. अब्दुल रजाक अन्सारी (मुंबई) यांच्या मालकीचा बार्ज असून, 20 ऑक्टोबर रोजी बाणकोट येथे पुलाच्या पिलरचे काम चालू असताना बुडालेल्या बार्जला पाण्यातून वरती खेचण्याकरिता त्यांनी बोया भाड्याने घेतला होता. परंतु, वातावरण खराब असल्यामुळे सदरील बोया तुटून समुद्रात भरकटला होता. त्यामुळे श्रीवर्धन परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी केले होते.







