आयआयटी पवईकडून अभिप्राय घेणार
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या कुंटे बागेतून सुरु आहे. सदरच्या जागेत सोयी-सुविधांची वाणवा तसेच सर्व विभाग एकाच छताखाली नसल्याने सर्वांसाठीच त्रासदायक ठरत आहे. शिवतीर्थ इमारत वापरण्यास अयोग्य असल्याचे आधीच स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सिद्ध झाले. ही इमारत अजून काही वर्ष वापरता येईल का हे तपासून पाहण्यासाठी आता आयआयटी पवई कडून दुसऱ्यांचा अभिप्राय मागवण्याचा नव्याने घाट घालण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.त्यामुळे अधिकारी,कर्मचाऱ्यांची अवस्था अजुनही तुझ्यात जीव गुंतला अशी झाल्याचे जाणवते.
सध्या या इमारतीमधून बहुतांश कार्यालये विविध ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आली आहेत. शिवतीर्थामधून बाहेर पडायचे नव्हते मग घाई कशाला केली, तसेच नव्याने स्थलांतरीत केलेल्या कार्यालयातील सोयी सुविधांसाठी लाखो रुपयांचा निधी कशाला खर्च केला असे प्रश्न त्या निमित्ताने आता उपस्थित होत आहेत.
1978 साली रायगड जिल्हा परिषदेच्या ‘शिवतीर्थ’ इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. 1982 साली ही इमारत बांधून तयार झाली होती. जिल्हा परिषदेचा कारभार एकाच इमारतीतून चालावा आणि सर्व विभाग एकाच इमारतीत कार्यरत असावेत, यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांनी ही इमारत बांधून घेतली होती. गेल्या काही वर्षापासून इमारतीची पडझड होत होती. वारंवार डागडुजी करण्यावर करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात येत होता. ही बाब लक्षात घेऊन इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठातील स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी इमारतीची पाहणी केली. यानंतर इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचा अंतरिम अहवाल त्यांनी प्रशासनाला सादर केला होता.
इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतरिम अहवाल 11 नोव्हेंबर 2021 ला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्राप्त झाला आहे. या अहवालात जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत जुनी झाली असून, शासकीय काम करण्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर इमारतीमधील सर्व कार्यालयीन विभाग अन्यत्र स्थलांतरीत केले. इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने इमारत बांधण्याबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेत झाला होता. त्यानुसार सरकरने आता 103 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे.
नव्याने स्थलांतरीत केलेल्या ठिकाणी सोयी-सुविधा उभारणे, तसेच ही जागा शहराच्या एका टोकाला आहे. सर्व कार्यालये एकाच छताखाली नसल्याने सर्वांनाच अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे आता इमारत वापरण्यास योग्य आहे का हे तपासण्यासाठी आयआयटी पवई कडून अभिप्राय घेण्यात येणार आहे.