भात झोडणीसाठी यंत्राचा आधार

| पाताळगंगा | वार्ताहर |

भात कापणी अंतिम टप्प्यात आली असून, आता भात झोडणीची प्रतीक्षा सुरु आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे शेतीच्या कामामध्ये शेतमजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी सध्या यांत्रिक शेतीकडे वळले आहेत. पूर्वीपासून शेतातील बहुतेक कामे ही शेतमजुरांकडून केली जात होती. मात्र, आता ते चित्र बदलत चालले आहे. दिवाळी संपली की प्रत्येकजण शहराकडे जात असतो. यामुळे भात झोडणींची कामे खोळंबली आहेत. मात्र, यंत्राच्या साहाय्याने भात झोडणी करण्यास शेतकरी मग्न झाला आहे.

मळणी यंत्र वापर करीत असताना शेतमजूर मिळाले नाही, तरी घरातील सदस्य या यंत्राच्या सहाय्याने भात झोडणी सुरु करु शकतात. यासाठी कुणावरही अवलंबून राहवे लागत नाही. वाढत्या महागाईमुळे मजुरांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच मजुरांची कमतरता, शिवाय या शेतीच्या कामासाठी खुप पैसा खर्च करावा लागतो. मात्र, उत्पन्न अल्पच मिळत असते. त्याचबरोबर वातावरणात सातत्याने फेरबदल होत असल्यामुळे शेतीचे उत्पन्न घटत चालले आहे. शेतीतून अधिक उत्पन्न आणि अल्प मनुष्यबळ यांची सांगड घालावी, या उद्देशाने शेतकरी वर्ग यंत्राच्या सहाय्याने भात झोडणी करीत आहे.

Exit mobile version