PNP Natyagruha: ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी देणारा नाट्यमहोत्सव

रसिक प्रेक्षकांकडून चित्रलेखा पाटील यांचे अभिनंदन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग येथे आयोजित ‘नाट्यप्रभा 2026 या ग्रामीण नाट्य महोत्सवा’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ देणारा हा उपक्रम कौतुकास पात्र ठरत आहे.

डिजिटल युगात ग्रामीण नाट्यपरंपरा जपणे हे मोठं सांस्कृतिक कार्य आहे. महोत्सवात सामाजिक, कौटुंबिक, भक्तीमय आणि विनोदी नाटकांचा संगम पाहायला मिळाला. ग्रामीण संस्कृती, भाषेचा गोडवा आणि अभिनयातील प्रामाणिकपणा प्रेक्षकांना भावला. अनेक ज्येष्ठ नाट्यप्रेमींनी ‘पूर्वी गावोगावी रंगणारी नाटकं पुन्हा जिवंत झाल्याची भावना या महोत्सवामुळे निर्माण झाली, असल्याचे मत दिपक पाटील यांनी व्यक्त केले.

नाट्यप्रभा पाहताना पुन्हा गावाकडची रंगभूमी जगल्यासारखं वाटलं. नाट्यप्रभा 2026 ग्रामीण नाट्य महोत्सव पाहताना मन खरंच भरून आलं. आजच्या मोबाईल आणि डिजिटल युगात गावोगावीची नाट्यपरंपरा पुन्हा इतक्या उत्साहात जिवंत झालेली पाहणं ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. अलिबागमध्ये पीएनपी कलाविकास मंडळाने उभा केलेला हा नाट्यमहोत्सव केवळ कार्यक्रम नाही, तर ग्रामीण संस्कृतीचा जिवंत उत्सव आहे असं मला वाटतं.

या महोत्सवात सहभागी झालेल्या कलाकारांच्या अभिनयात एक प्रामाणिकपणा जाणवला. त्यांच्या संवादांमध्ये गावाकडची माती होती, भावना होत्या आणि नात्यांचा गोडवा होता. प्रत्येक नाटक संपल्यानंतर मिळणाऱ्या टाळ्या या केवळ कौतुकाच्या नव्हत्या, तर त्या ग्रामीण रंगभूमीवरच्या प्रेमाच्या होत्या.

पूर्वी गावोगावी जत्रांमध्ये, उत्सवांमध्ये नाटकं व्हायची. संपूर्ण गाव एकत्र बसून नाटक पाहायचं. तीच भावना या महोत्सवामुळे पुन्हा अनुभवायला मिळाली. विशेष म्हणजे नवोदित कलाकारांनाही इतक्या मोठ्या रंगमंचावर उभं राहण्याची संधी मिळाली, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पीएनपी कलाविकास मंडळाने हा उपक्रम राबवून केवळ नाटकं सादर केली नाहीत, तर अनेक कलाकारांना नवी ओळख आणि नवा आत्मविश्वास दिला आहे. आजच्या काळात जिवंत रंगभूमी टिकवणं खूप कठीण आहे. अशा वेळी ग्रामीण रंगभूमीसाठी इतक्या तळमळीने काम करणाऱ्या सर्व नाट्यकर्मींचं मनापासून कौतुक वाटतं.हा महोत्सव पुढील काळात आणखी मोठा व्हावा, अधिक गावांपर्यंत पोहोचावा आणि ग्रामीण कलाकारांना असंच व्यासपीठ मिळत राहावं, हीच अपेक्षा.

साक्षी संतोष नाईक

नाट्यप्रभा 2026 ग्रामीण नाट्य महोत्सवामुळे अलिबागमध्ये पुन्हा एकदा नाटकांचं सुंदर वातावरण निर्माण झालं. गावागावातील कलाकारांना मोठ्या रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली, ही खूप आनंदाची गोष्ट आहे.

आजच्या डिजिटल युगात ग्रामीण रंगभूमी जिवंत ठेवणं सोपं नाही. पण पीएनपी कलाविकास मंडळाने घेतलेल्या या उपक्रमामुळे अनेक कलाकारांना नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळाला आहे. प्रत्येक नाटकामध्ये ग्रामीण मातीचा सुगंध आणि कलाकारांची मेहनत स्पष्टपणे जाणवत होती. विशेष म्हणजे चित्रलेखा ताई म्हणजेच आमच्या लाडक्या चिऊताई यांनी ग्रामीण कलाकारांवर ठेवलेला विश्वास आणि दिलेलं पाठबळ खूप मोठं आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हा महोत्सव इतक्या सुंदर पद्धतीने उभा राहिला. हा महोत्सव पुढील वर्षी आणखी मोठ्या स्वरूपात व्हावा आणि ग्रामीण रंगभूमीचा हा दीप असाच तेवत राहावा, हीच मनापासून इच्छा.

-अनिल पाटील
Exit mobile version