दुःखावर डागण्या

अखेर राज्याचे अर्थ खाते अजित पवार यांच्याकडेच गेले आहे. अजितदादा अडवणूक करतात असे गेल्या वर्षी शिंदे गटाचे आमदार बंड करताना म्हणत होते. आता ते पुन्हा सरकारात आले तरी किमान त्यांना अर्थ खाते देऊ नका असे त्यांचे म्हणणे होते. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी जी ढीगभर खाती गेले वर्षभर आपल्याकडे ठेवली होती त्यात गृह, जलसंपदा, उर्जा इत्यादींसोबत अर्थ हेही होते. ते मुनगंटीवार, गिरीश महाजन किंवा चंद्रकांत पाटील अशा कोणा भाजपच्या सहकाऱ्याला द्यायलाही ते राजी नव्हते. तेच खाते आता त्यांनी अजितदादांकडे सोपवले आहे. एकूण खातेवाटपाने शिंदे गट व भाजप अशा दोहोंच्याही दुःखावर डागण्याच दिल्या असतील. शिंदे गट एका झटक्यात पन्नास आमदार घेऊन आला होता. याउलट दादांकडे नक्की किती आमदार आहेत हे अजूनही कोणालाच ठाऊक नाही. तरीही शिंदे आणि देवेंद्रांना दादांपुढे मान तुकवावी लागली असून स्वतःहून त्यांनी सरकारच्या चाव्या दादांकडे सोपवल्या आहेत. भाजपच्या भक्तांना आपला पक्ष इतका लाचार झालेला पाहणे मानवेल काय? देवेंद्रांनी जेव्हा यंदाचा अर्थसंकल्प मांडला तेव्हा हा चुनावी जुमला आहे अशी टीका दादांनी केली होती. आता तोच संकल्प दादांना पुरा करावा लागणार आहे हीच त्यातल्या त्यात भाजपसाठी समाधानाची गोष्ट असेल. सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीने शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केला आहे असे पंतप्रधानांनी नाव घेऊन जाहीर भाषणात सांगितल्याला अजून वीस दिवसही झालेले नाहीत. तोवर, त्याच राष्ट्रवादीकडे अत्यंत कळीचे असे सहकार खातेही गेले आहे. ते दिलीप वळसेंनाच मिळाल्यामुळे शरद पवार गटाच्या आमदारांनाही हायसे वाटले असेल. ज्या हसन मुश्रीफांना इडीमार्फत तुरुंगात धाडण्याची तयारी चालू होती ते आता वैद्यकीय शिक्षण खाते सांभाळणार आहेत.

गोगावलेंचा कोट

काही बदल स्वागतार्ह आहेत. ज्या बिल्डर लोढांनी सह्याद्रीच्या सर्व दिशांनी मोक्याच्या जागा घेऊन ठेवल्या आहेत त्यांच्याच घरातील मंगलप्रभात लोंढाकडे पर्यटन खाते असणे हे योग्य नव्हते असे आम्ही गेल्या वाटपाच्या वेळीच म्हटले होते. ती दुरुस्ती शिंदे यांनी आता केली आहे. श्रध्दा वालकर हत्या प्रकरणाच्या निमित्ताने लव्ह जिहादच्या मोहिमा चालवण्याची फूस देणाऱ्या लोढांकडे महिला व बालकल्याण खाती असणे हेही आक्षेपार्ह होते. तेही बदलले गेले आहे. खातेवाटप झाले, पण विस्तार कधी हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. भरत गोगावले यांचा कोट कपाटाबाहेर येण्याची वाट पाहतो आहे. पण त्याला इतक्यात संधी दिसत नाही. एकूणच मंत्रिपदे मिळण्यात व खातेवाटपात राष्ट्रवादीचे जे काही चांगभले झाले आहे त्यामुळे शिंदे गट व भाजपमध्ये मोठी अस्वस्थता आहे. सध्या विस्ताराचे गाजर दाखवून ही दाबून ठेवली जाईल. मात्र तिचा कधीही स्फोट होऊ शकतो. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांना याची पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच त्यांनी आपापल्या नेत्या-कार्यकर्त्यांना चुचकारणे सुरू केले आहे. दादा गट आल्यामुळे एकूण बेरीज होऊन आपले भलेच होईल असे शिंदे सांगत आहेत. तर नरेंद्र मोदींच्या महाविजयासाठी हे सर्व आवश्यक आहे अशी साखर शिंपडणी देवेंद्रांनी चालवली आहे. तरीही त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना ही कडू गोळी घशाखाली उतरेल का हे कोणीही सांगू शकत नाही. एकेकाळी भाऊसाहेब फुंडकर प्रदेशाध्यक्ष असताना भाजपने शत-प्रतिशत भाजप असा नारा दिला होता. त्यावेळी बाळ ठाकरे व प्रमोद महाजन हयात होते. सेना-भाजप युतीही जोरात होती आणि मुख्य म्हणजे राज्यामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ आहे हे तेव्हा सर्वांनाच मान्य होतं. तरीही भाजपने आपले इरादे लपवले नव्हते. तसा शत-प्रतिशतचा नकाशाच त्यांनी भाजप कार्यालयात लावला होता. प्रत्येक पक्षाला वाढण्याचा हक्क आहे असा भाजपचा तेव्हाचा दावा होता.

शब्दांचे खेळ

भाजपचा तेव्हाचा विस्तार हा शिवसेनेच्या जिवावरच झाला. पण शत-प्रतिशतसारखे शब्दांचे खेळ करीत त्यांनी आपले धोरण पुढे रेटले. तीच परंपरा अजूनही चालू आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपद्धर्म म्हणून काही पक्षांशी युती करावी लागते असे म्हटले होते. त्यावर राष्ट्रवादीशी युती करणार का असा प्रश्न केला असता नाही असे तीन वेळा ठासून सांगितले होते. आपद्धर्म म्हणूनदेखील नाही असे ते म्हणाले. होते. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीने त्यांचे तोंड पोळले होते. पण तरीही आता पुन्हा एकवार अजितदादांच्या गटाला मंत्रिमंडळात सामील करून घेतले गेले आहे. यामुळे खुद्द भाजपमध्ये आणि शिंदे गटात मोठी नाराजी आहे हे लक्षात येताच आता पुन्हा शब्दांचे खेळ सुरू झाले आहेत. शिंदे गटासोबत आमचे भावनिक नाते आहे, तर राष्ट्रवादीसोबत राजकीय नाते असे फडणवीस कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात म्हणाले. राष्ट्रवादीला बरोबर घेणे हा अधर्म नसून कूटनीती आहे असेही ते म्हणाले. यापूर्वी काहीच दिवस आधी राजकारणात दहा-वीस टक्के अनैतिक गोष्टी कराव्याच लागतात असे एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते. पूर्वापार संघाच्या बौध्दिकांमधून अशाच प्रकारचे शब्दांचे खेळ केले जात असतात. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरुध्द नाही, पण हा देश हिंदूंचा आहे हे सांगणे हा त्यातला नामांकित शाब्दिक खेळ आहे. पण अशा खेळांमुळे कार्यकर्त्यांची आणि त्याहूनही अधिक म्हणजे भाजपच्या मतदारांची समजूत पटणार आहे का हा खरा प्रश्न आहे. सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाण्याच्या प्रवृत्तीवर पांघरूण टाकू शकतील का हा प्रश्न आहे. 2019 मध्ये साथ सोडून शिवसेनेनेच बेईमानी केली हे सिध्द करण्याचा देवेंद्रांचा सततचा प्रयत्न असतो. समजा त्यांना शह देण्यासाठी पहाटेचा शपथविधी क्षम्य मानला तरी आता सरकार स्थिर असताना अजितदादांना फोडणे हे कोणत्या तत्वांमध्ये बसवणार? हे सर्व कशासाठी चालू आहे या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. खातेवाटप हे कार्यकर्त्यांच्या दुःखावर आणखी डागण्या देणारे आहे.  

Exit mobile version