| पाली | प्रतिनिधी |
जिल्ह्यात पावसाला काही दिवसांपूर्वीच दमदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीला फक्त रायगडसह कोकणात मिळणाऱ्या ‘मूठ्यांचे’ (खेकड्याची एक वैशिष्ट्यपूर्ण जात) आगमन झाले आहे. निसर्गाचा हा रानमेवा खवय्यांसाठी पर्वणी ठरत आहे. आरोग्यवर्धक, चविष्ट व लज्जतदार मूठ्यांना खाण्यासाठी खवय्ये आतुर झाले असून, गावागावांत रात्रीच्या वेळी मुठे पकडण्याची अनोखी लगबग व मज्जा पाहायला मिळत आहे.
पहिल्या पावसाच्या सरींमुळे माळरान, शेत आणि डोंगरउतारावरील जमीन ओली झाली असून कोवळे गवत डोलू लागले आहे. याच कोवळ्या गवतावर गुजरान करणारे मूठे रात्रीच्या वेळी रिमझिम पावसात बिळातून बाहेर पडतात. हातात बॅटरी, गॅसबत्ती किंवा जळता टायर घेऊन आणि सोबत प्लास्टिकची बादली किंवा गोणपाट घेऊन ग्रामीण भागातील लोक रात्रीचे मुठे पकडण्यासाठी बाहेर पडतात. प्रकाशझोतात जागच्या जागी थांबणाऱ्या या मूठ्यांना दबक्या पावलांनी जाऊन पकडणे हा एक रंजक अनुभव असतो.
इतर खेकड्यांपेक्षा आकाराने लहान असलेल्या मूठ्यांचा रंग तजेलेदार काळा-पिवळा असतो. यांचा पाठीचा भाग गोलाकार आणि चकाकणारा असून, पाय पांढरे-पिवळे असतात. एक नांगडा मोठा तर एक लहान, अशी यांची वैशिष्ट्यपूर्ण ठेवण असते. मूठ्यांचे मांस अत्यंत चविष्ट व आरोग्यवर्धक मानले जाते. याचे कवच काढून त्यात मूग, तांदूळ किंवा चण्याच्या पिठाचे मिश्रण भरले जाते व पुन्हा धाग्याने बांधून रस्सा (कालवण) केला जातो. ही पारंपरिक पद्धत खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मूठे विकून स्थानिक आदिवासी बांधवांना दोन पैसे मिळतात. अनेक जण मुंबई-पुण्यातील नातेवाईकांना ही हक्काची भेट म्हणून पाठवतात. तर काही जण मुंबई पुण्यावरून खास मुठे पकडण्यासाठी गावी येतात.
धोक्याची घंटा
वाढते प्रदूषण, शहरीकरण आणि सिमेंटची बांधकामे यामुळे मूठ्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळेही आता त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. मात्र गाव खेड्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर मुठे सापडतात.
