मोटारसायकलस्वार गंभीर जखमी
। पाली । वार्ताहर ।
पाली खोपोली राज्य महामार्गावर खुरावले फाटा एचपी पेट्रोल पंपासमोरील एका मोठ्या वडाच्या झाडाला सोमवारी (दि.18) आग लागली होती. त्यामुळे रात्री हे झाड रस्त्यावर कोसळले. या झाडावर धडकून मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शॉर्टसर्किटमुळे दुपारी या झाडाला आग लागली होती. येथील स्थानिकांनी, पेट्रोलपंप व्यवस्थापक संदीप जाधव व कर्मचारी, नर्सरीतील कर्मचारी विजय दिवा, अलका दिवा, तेजस दिवा, सुजल दिवा, प्रदीप यादव, अतिष सागळे व शुभम गुप्ता यांनी मोटारपंप लावून पाण्याने ही आग विझवली. मात्र, सायंकाळी पुन्हा या झाडाने पेट घेतला. रात्री या आगीमुळे झाडाचा बराचसा भाग भर रस्त्यात खाली कोसळला. यावेळी या झाडाला ठोकून किंवा झाड अंगावर पडून भेरव येथील विजय सागळे हे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.