पाली/बेणसे, प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पडसरे येथे जागतिक आदिवासी दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी रांगोळी, चित्रकला, वैविध्यपूर्ण पारंपरिक नृत्य आणि वक्तृत्वातून आदिवासी संस्कृतीचे अनोखे दर्शन घडविले. आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव व कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, या कार्यक्रमाला कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पाली या संस्थेच्या वावळोली आश्रमशाळेत शिकलेले तालुक्याचे सुपुत्र व गटशिक्षणाधिकारी सादूराम बांगारे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थांच्या विविध कलागुणांचे कौतुक करून आश्रमशाळेत शिक्षण घेऊन मेहनत केलीत तर मेहनतीचे फळ निश्चित मिळते, असे मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पडसरे ग्रामस्थ, पालकवर्ग, माध्यमिक मुख्याध्यापक संदिप शिंदे, प्राथमिक मुख्याध्यापिका मिनाक्षी ढोपे, अधीक्षक माळी, अधिक्षिका इंगळे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रमशाळेतील शिक्षिका गार्गी चोरगे, अनिल साजेकर, श्वेता जाधव, दिपाली घरट, सुधीर क्षीरसागर, भडवळकर मॅडम यांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक गणेश महाडिक यांनी केले.