ग्रामस्थ कायदेशीर मार्गाने लढणार
तळा, वार्ताहर
तळा शहरातील डम्पिंग ग्राऊंडच्या जागेचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील डम्पिंग ग्राऊंड आंबेळी येथे हलविण्यास राणेचीवाडी, आंबेळी बौद्धवाडी व आंबेळी आदिवासीवाडी या तिन्ही गावांचा तीव्र विरोध कायम असून डम्पिंग ग्राऊंड विरोधात आता कायदेशीर मार्गाने लढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तळा शहरात तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्या शेजारी असलेल्या डम्पिंग ग्राऊंडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या ठिकाणी कचऱ्याचे विघटन होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते.
याच ठिकाणी अर्ध्या शहराला पाणी पुरवठा करणारी बोरिंग असल्याने येथे मुरत असलेल्या घाणीच्या पाण्यामुळे नागरिकांना साथीचे आजार होण्याची शक्यता आहे.त्यामुळे येथील डम्पिंग ग्राऊंड इतरत्र हलविण्याची जोरदार मागणी शहरवासीयांकडून करण्यात आली होती. त्यावर नगरपंचायत प्रशासनाने सदर डम्पिंग ग्राऊंड आंबेळी येथे नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेत स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू केल्या.तसेच त्याच्या कामास सुरुवातही करण्यात आली.
मात्र येथे असलेल्या राणेची वाडी,आंबेळी बौद्धवाडी, आंबेळी आदिवासीवाडी ग्रामस्थांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे.याआधी या तिन्ही गावातील ग्रामस्थांकडून नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला होता व आंबेळी येथे डम्पिंग ग्राऊंड करण्यात येऊ नये यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी तिन्ही गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना देण्यात आले होते. मात्र नगरपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता आंबेळी येथे डम्पिंग ग्राऊंडचे काम सुरूच ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.त्यामुळे राणेची वाडी,मुंबईकर मंडळ,आंबेळी बौद्धवाडी व आंबेळी आदिवासीवाडी या तिन्ही गावांची संयुक्त मिटिंग पार पडली व या मिटिंगमध्ये आंबेळी येथे होत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडला अद्यापही ग्रामस्थांचा विरोध कायम असून डम्पिंग ग्राऊंड विरोधात आता कायदेशीर मार्गाने लढणार असल्याचा निर्णय तिन्ही गावच्या ग्रामस्थांकडून घेण्यात आला. याप्रसंगी तिन्ही गावाचे ग्रामस्थ,महिला मंडळ व मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.