आमदार, अदानी आणि वकील… अलिबागमध्ये फिरतेय चर्चेची ‘व्हीआयपी’ गाडी!

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरात सध्या एका चारचाकी वाहनाची जोरदार चर्चा रंगली आहे. या वाहनावर झळकणाऱ्या काही उल्लेखांमुळे हे वाहन नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून शहरातील राजकीय, सामाजिक आणि कायदेविषयक वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे.

सामान्यतः वाहनांवर एखाद्या संस्थेचा किंवा व्यवसायाचा उल्लेख दिसून येतो. मात्र या वाहनावर आमदार, अदानी आणि वकील अशा प्रभावशाली क्षेत्रांशी संबंधित शब्द झळकत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे हे वाहन नेमकं कोणाशी निगडीत आहे, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

अलिबागमधील विविध चौकांमध्ये हे वाहन दिसताच त्याकडे अनेकांचे लक्ष वेधले जात आहे. काहीजण याकडे केवळ व्यावसायिक ओळखीचा भाग म्हणून पाहत आहेत, तर काहीजण या वाहनामागील संदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावरही या वाहनाचे फोटो आणि चर्चा व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, अलिबागमध्ये राजकीय घडामोडी, विविध विकास प्रकल्प आणि कायदेशीर विषयांवर सातत्याने चर्चा सुरू असताना अशा प्रकारच्या वाहनाने शहरातील चर्चांना आणखी उधाण आले आहे. त्यामुळे हे वाहन केवळ प्रवासाचे साधन न राहता चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, या वाहनाबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात असले तरी त्यामागे कोणताही अधिकृत राजकीय अथवा व्यावसायिक संदेश असल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र आमदार, अदानी आणि वकील या शब्दांच्या अनोख्या संगमामुळे अलिबागकरांमध्ये उत्सुकता कायम आहे. गाडीत नेमकं कोण बसतं? यापेक्षा गाडीवर नेमकं कोण कोण बसलंय? याचीच उत्सुकता अधिक असल्याचे दिसून येत आहे.

काही मिश्किल नागरिकांच्या मते, आमदार निर्णय घेईल, अदानी प्रकल्प उभा करेल आणि वकील केस लढवेल… मग उरतं तरी काय? तर काहींनी याला ‘सत्ता, पैसा आणि कायदा एका नंबर प्लेटवर’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे.

Exit mobile version