| पनवेल | प्रतिनिधी |
किरकोळ भांडणातून लोखंडी पाईपने वॉचमेनच्या डोक्यात फटका मारून त्याची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला कामोठे पोलिसांनी अटक केली. कृष्णकांत रामा पांडे (29), मिर्झापूर, उत्तर प्रदेश असे मृत इसमाचे नाव आहे.
मृत कृष्णकांत पांडे हा आयुषी एम्पायर बांधकाम साईट, सेक्टर पाच, कामोठे या ठिकाणी वॉचमेन म्हणून काम करतो. त्या ठिकाणी सुतार काम करणारा छोटू कुमार रामश्रेष्ठ राय (29), समस्तीपुर, बिहार यांच्यात भांडण झाले होते. या भांडणांमध्ये छोटू कुमार याने लोखंडी पाईपने वॉचमेन कृष्णकांत याच्या डोक्यात फटका मारून त्याला जखमी केले. यात कृष्णकांत याचा मृत्यू झाला. कामोठे पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, पोलीस हवालदार संजय झोळ, मनोज माने, सचिन ठोंबरे, राजेश इलग, नितीन गायकवाड, दत्ता जाधव, विकास कामनूरकर यांचे पथक तयार करण्यात आले. यावेळी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपी हा वारंवार ठिकाण बदलत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपी छोटू कुमार हा त्याच्या मूळ गावी बिहार राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला लोकमान्य टिळक टर्मिनल येथे पकडून ताब्यात घेतले. ट्रेन सुटण्यासाठी अवघी सात मिनिटे बाकी असताना रेल्वेत तपासणी करून पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.