कारमधील डॉक्टर व मित्र गंभीर जखमी
| पाली/बेणसे | वार्ताहर |
पाली खोपोली राज्य महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पालीनजिक असलेल्या दापोडे गावाजवळ मंगळवारी (दि.17) एनसीसीचे विद्यार्थी घेऊन जाणारी परिवहन महामंडळाची बस व कारचा भीषण अपघात झाला. यावेळी बसचा रॉड तुटला, बस वाहन चालकाला अनियंत्रित होत बाजूच्या शेतात कलंडली, मात्र दैव बलवत्तर म्हणून यामध्ये 45 विद्यार्थी थोडक्यात बचावले असून सुखरूप आहेत. तर कारचे नुकसान झाले आहे. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात सेलेरो कारमधील डॉ. आयुष गायकवाड व विशाल पाटील जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाली खोपोली राज्य महामार्गावर कर्जतहुन एनसीसीचे विद्यार्थी घेऊन पालीकडून लोणेरेकडे जाणारी कर्जत आगाराची बस व पालीकडून खोपोली बाजूकडे आयुष गायकवाड चालवत असलेली सेलेरिओ कार यांचा समोरासमोर अपघात झाला. यावेळी एसटी बसचा पाटा तुटल्यामुळे स्टेरिंग लॉक झाले आणि एसटी बस हळुवारपणे बाजूच्या शेतामध्ये कलंडली. कारच्या सीट बेल्ट व एअर बॅग उघडल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र कारचालकाच्या हाताला दुखापत झाली व शेजारच्या प्रवासाच्या डोक्याला लागले आहे. एनसीसीचे विद्यार्थी लोणेरे येथे कॅम्पसाठी जात होते. अपघातानंतर हे विद्यार्थी सुखरूप असल्यामुळे त्यांनी दुसरी गाडी करून ते लोणेरेकडे रवाना झाले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक व पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले.