| पाताळगंगा | प्रतिनिधी |
माजगाव, आंबिवली, वारद या गावांमध्ये दोन ते तीन महिन्यांपासून घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. चोरट्यांकडून बंद घरांना लक्ष्य केले जात असून, घरातील मौल्यवान वस्तू आणि रोकड लंपास केली जात असल्याचे समोर येत आहे. या घटनांमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरातील सदस्य बाहेरगावी किंवा पर्यटनासाठी गेले असल्याची संधी साधून चोरटे बंद दरवाजांचा फायदा घेत घरात प्रवेश करतात. घरातील कपाटे, फ्रिज, तांदळाची पिंपे तसेच लहान-मोठे स्टीलचे डबे उघडून त्यामध्ये मौल्यवान वस्तू किंवा पैसे आहेत का, याची तपासणी केली जाते. यावेळी घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूसही केली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. साधारणपणे रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास या चोरीच्या घटना घडत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीने सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, परिसरात फेरीवाल्यांना प्रवेश निषिद्ध असल्याचे फलकही लावले आहेत. तरीही चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत.
माजगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
