| माथेरान | प्रतिनिधी |
पांडे रोड येथील रुपाली ढोले या महिलेने फोटोग्राफी क्षेत्रात झेप घेतली असून, आपल्या पती समवेत शार्लोट लेकवर पर्यटकांचे उत्कृष्ट फोटो काढून ताबडतोब त्याच्या कॉपी विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. रुपाली ढोले या एक कष्टाळू महिला असून, जिद्द आणि मेहनत या बळावर स्वतःच्या व्यवसायात कार्यरत राहून आपल्या कौटुंबिक आणि मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी फोटोग्राफी हे क्षेत्र निवडले असून, त्यांना या व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दुर्गम पर्यटनस्थळ माथेरानमध्ये अनेक सुशिक्षित तसेच पदवीधर महिला विवाह होऊन इथे आल्यानंतर त्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय करता यावा यासाठी मार्ग सापडत नव्हता. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांची नेहमीच तळमळ असते. परंतु, याठिकाणी कोणत्याही प्रकारची औद्योगिक इंडस्ट्री नसल्याने बहुतांश महिला आपल्या दुकानात, स्टॉल्सवर तर कुणी हॉटेल्समध्ये भाकरी बनवून देण्याचे घरगुती व्यवसाय करताना दिसतात. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राजकीय मंडळींकडून काहीही हालचाली होताना दिसून येत नाहीत. उच्च शिक्षण घेऊन सुध्दा इथे शिक्षणाला साजेसे काम नसल्याने अनेक महिला आजही घरात बसून आपल्या मुलाबाळांचे संगोपन अर्थातच चूल आणि मूल यापलीकडे काहीच करू शकत नाहीत.
वाढती महागाई आणि मुलांचे शिक्षण याचा खर्च पती किशोर ढोले यांनाच करावा लागत होता. त्यामुळे संसाराचा गाडा चालविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. इथे नोकरी करण्यासाठी अन्य कोणत्याही प्रकारचे साधन नाही यासाठी आपण सुध्दा कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेता आपल्या परीने संसाराला हातभार लावला पाहिजे या हेतूने फोटोग्राफी हे क्षेत्र निवडले असून यात पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रुपाली ढोले
