। पनवेल । वार्ताहर ।
उसने दिलेल्या पैशांची मागणी केल्याच्या रागातून मित्रानेच आपल्या मित्राला इतर तीन मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण करुन पलायन केल्याची घटना कळंबोलीत घडली. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी चौघा आरोपींविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेतील जखमी विशाल आहेर (32) कळंबोलीत राहण्यास असून त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तर प्रमुख आरोपी शरद ढोले देखील कळंबोलीत राहण्यास असून तो विशालचा मित्र आहे. दोन आठवड्यापूर्वी विशालने शरदला हातऊसने 500 रुपये दिले होते. त्यानंतर विशाल त्याला फोन करुन आपल्या पैशांची मागणी करत होता. मात्र, शरद त्याचा फोन उचलत नव्हता. धुलीवंदनाच्या दिवशी रात्री विशाल त्याच्या मित्रासोबत कळंबोलीतील बारमध्ये दारु पिण्यासाठी गेला असताना, तेथे शरद ढोले देखील त्याचा मित्र हिरामन बेलोटे याच्यासह दारु पिण्यासाठी गेला होता. यावेळी विशालने त्याच्याकडे उसने पैशांबाबत विचारणा केल्यानंतर त्यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यामुळे बार मालकाने त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्यामध्ये धक्काबुक्की आणि शिवीगाळी झाली. त्यानंतर हिरामन याने फोन करुन आपल्या मित्रांना बोलावून घेतले. काही वेळानंतर सदर ठिकाणी स्कॉर्पीओमधून दोन अनोळखी व्यक्तींनी तसेच शरद आणि हिरामन या चौघांनी विशाल आणि उस्मान या दोघांना लाथा-बुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विशाल जखमी झाल्यानंतर चौघा मारेकर्यांनी तेथून पलायन केले. त्यानंतर विशालने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मारहाण करणार्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यापैकी शरद ढोले, हिरामन बेलोटे या दोघांना अटक केली आहे.