| ठाणे | प्रतिनिधी |
गायमुख येथील वाहतूक कोंडीमुळे एका महिलेला रुग्णवाहिकेमध्ये अखेरचा श्वास घ्यावा लागला. या घटनेमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थापनावरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
छाया पुरव असे या महिलेचे नाव आहे. छाया पुरव या मूळच्या सफाळ्याच्या असून मुंबईतील माहीम कोळीवाडा येथे वास्तव्यास होत्या. त्या पालघर तालुक्यामधील सफाळे येथील मधुकर नगरमध्ये आल्या होत्या. पालघर जिल्हा परिषदेची शाळा आणि घराजवळ झाडांच्या फांद्या कापण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक झाडाची फांदी कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना पालघरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर होत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना माहीममधील हिंदुजा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.
मुंबईकडे जाताना घोडबंदर महामार्गावरील दुरुस्ती कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे छाया पुरव असलेल्या रुग्णवाहिकेला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. त्यातच त्यांना दिलेल्या अनेस्थेशियाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला होता. शेवटी छाया पुरव यांच्या पतीने त्यांना मिरा रोडमधील ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी छाया पुरव यांना मृत घोषित केले. रुग्णवाहिका वेळेत इस्पितळात पोहोचली असती, तर छाया पुरव यांचे प्राण कदाचित वाचले असते. या घटनेमुळे महामार्गावरील दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थापनावरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






