। अलिबाग । प्रतिनिधी ।
रक्कम अधिक देण्याचे आमिष दाखवत नागावमधील एका महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेत झालेल्या चौकशीनंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे. अलिबाग येथील न्यायालयाने तिला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फिर्यादी धीरेंद्र सिंग यांच्या तक्रारीनुसार, अस्मिता पाटील असे या फसवणूक करणार्या महिलेचे नाव आहे. 50 हजार रुपये गुंतवणूक केल्यास सहा दिवसात 25 टक्के नफा, एक लाख गुंतवणूक केल्यास 17 दिवसात 30 टक्के, सात लाख गुंतवणूक केल्यास 20 दिवसांत 30 टक्के अशा वेगवेगळ्या सवलती देऊन कमी कालावधीत व्याजदरापेक्षा जास्त रक्कम परतावा देण्याचे आमिष तिने दाखवून लाखो रुपये गुंतविण्यास भाग पाडले. सुरुवातीला तिने विश्वास संपादन केला. तिच्या या आमिषाला बळी पडत सिंग यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक त्यांच्याकडे केली. परंतु, त्यानंतर तिच्याकडून ती रक्कम देण्यास टाळाटाळ होऊ लागली. सात लाख 37 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सिंग यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली. सुनील प्रसाद, महेंद्र ठाकूर, कुणाल तळकर, मनीष पाटील, मिहीर ठाकूर, ऋचा ठाकूर यांच्यासह अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये अस्मिता पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे करीत आहेत.